नारळ, फुले महाग; बाजार, रस्ते गजबजले

गणरायाच्या स्वागतासाठी फुले, फळे, प्रसाद, भाज्या, पूजा आणि सजावट साहित्याची खरेदी करणाऱ्यांच्या गर्दीने नवी मुंबई आणि पनवेल परिसरातीस सर्व बाजारांत गुरुवारी झुंबड उडाली. त्यातच घरगुती आणि सार्वजनिक गणपतीच्या आगमन मिरवणुकांची भर पडल्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते गजबजले होते. मोठी मागणी असल्यामुळे फुलांच्या किमतीत वाढ झाली.

फुलांच्या किमतीत सुमारे ४० रुपयांची वाढ झाली आहे. पाऊस आणि कमी लागवड यामुळे यंदा झेंडूच्या फुलांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे झेंडू महागल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ६० ते ७० रुपये प्रति किलोने मिळणारी फुले यंदा १०० ते १२० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहेत. हलवायांच्या दुकानांत मोदकांना मोठी मागणी होती. मोठे मोदक खरेदी करण्यात येत होते. मिठाईच्या किमतीत मात्र फारशी वाढ न झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

नारळांच्या किमतीत ४ रुपयांची वाढ

गुरुवारी बाजारात नारळ खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. घाऊक बाजारात ५० गाडय़ा नारळ आले होते, मात्र मोठी मागणी असल्यामुळे तीन दिवसांपासून नारळाचे भाव ४ रुपयांनी वाढले आहेत.