मुंबई येथील मराठा मुक क्रांती मोर्चाचा हुबेहूब देखावा गणपती उत्सवाच्या निमित्ताने एका तरुणाने साकारला आहे. गणेश गोजरे असं या तरुणाचं नाव असून औरंगाबाद जिल्हातील पैठण शहरातील नारळा भागातील घरच्या गणपतीसमोर त्याने हा देखावा साकारला आहे. गणेश मागील तीन वर्षांपासून विविध सामाजिक विषयावर देखावे तयार करतो. यावर्षी मराठा समाजाने राज्यभर आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले. या वर्षांत मराठा मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळेच तरुणाने हा देखावा साकारला.

कोपर्डी येथील घटनेनंतर राज्यभरात मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले. मुंबई येथे भव्य क्रांती मूक मोर्चा काढून देखील सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. समाजाला प्रेरणा मिळावी, तसेच त्यांच्यात जागृती व्हावी, यासाठी ‘मुंबई मराठा मूक क्रांती मोर्चा’ हा देखावा तयार केला, असे गणेश श्रीधर गोजरे याने सांगितले. देखाव्यात मुंबई येथील मोर्चाची क्षणचित्रे दाखवण्यात आली आहेत. तसेच कोपर्डी येथील घटनेचा निषेध करत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, ही मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक मोर्चात निवेदन देणाऱ्या आणि भाषण करणाऱ्या मुली देखील दाखवण्यात आल्या आहेत.

उच्चशिक्षित आणि कलेची आवड असणारा हा तरुण गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक समाजाला एक सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने स्वतःच्या घरात देखावा तयार करतो. यामध्ये पर्यावरण, ‘बेटी बचाव’, शेतकरी आत्महत्या, या विषयावर देखावे केल्यानंतर या वर्षी गणेशने मराठा क्रांती मूक मोर्चा या विषयावर देखावा तयार केला. हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.