News Flash

Ganesh Chaturthi 2017: गणपती माझा नाचत आला!; मुंबई, पुण्यासह अवघा महाराष्ट्र भक्तीरसात चिंब

बाप्पाचे आगमन थाटामाटात

पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळ व जिलब्या मारूती मंडळाची श्री गणेशाची मूर्ती. (छाया: तन्मय ठोंबरे)

‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले. मुंबई, पुण्यासह राज्यभरात आगमन सोहळ्याचा उत्साह दिसून आला. अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

 

सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन आणि पहाटेपासूनच राज्यभरातील अनेक भागांत पावसाने लावलेली हजेरी यामुळे भक्तगण भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाले. मुंबईसह उपनगरे, पुणे शहर आणि परिसरात जोरदार सरी बरसल्या. पावसाच्या सरी कोसळत असतानाच भाविकांनी कार्यशाळा गाठल्या आणि गणेशमूर्ती घरी घेऊन आले. रिक्षा, मालवाहू टेम्पो, कार आणि मोटरसायकलींवरून भक्त गणेशमूर्ती घरी घेऊन येत होते. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात मूर्ती मंडळांमध्ये नेल्या. भक्तांच्या गर्दीने शहरांतील रस्ते फुलून गेले होते. भक्ती आणि शक्तीचा संगम ‘याचि देहि…’ अनुभवायला मिळाला. घराघरांत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आरती, गणपती स्त्रोत, मंत्र असे मंगलदायी वातावरण घरोघरी पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनामुळे मुलांच्या चेहऱ्यांवर आनंद झळकत होता. तरुणाई बाप्पासोबत सेल्फी काढताना दिसत होते. आपल्या घरातील गणेशाची छबी मोबाईल कॅमेऱ्यात टिपत होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे मंडळांच्या सदस्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.

मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी गणपती आगमनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, गुलाल, फुलांची उधळण करत मूर्ती मंडपात नेण्यात आल्या. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजासह मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांतील बाप्पा थाटामाटात स्थानापन्न झाले. पुणेही बाप्पाच्या आगमनाने भक्तिमय झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आगमन मिरवणुकीला सकाळी पावणे नऊच्या सुमारास सुरुवात झाली. त्याचवेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या गणपतीची मिरवणूकही काढण्यात आली. या मिरवणुकांमध्ये शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. घरोघरीही गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 12:17 pm

Web Title: ganesh chaturthi 2017 mumbai pune maharashtra celebrate ganesh chaturthi festivals
Next Stories
1 Ganesh Utsav 2017: जाणून घ्या गणपतीच्या या रुपांविषयी…
2 Ganesh Utsav Recipes 2017 : काजूकंद
3 VIDEO: पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
Just Now!
X