News Flash

नव्या पूजासाहित्यासोबत पत्रींनीही बाजार फुलला

चाकरमान्यांच्या शहरात गणशोत्सवाची तयारी अवघ्या काही दिवसांपूर्वी केली जाते.

चाकरमान्यांचे शहर असले तरी बदलापूर शहराला ग्रामीण भागाची किनार आहे. त्यामुळे आजही गणेशोत्सवात नव्या रूपासह पारंपरिक पद्धतीही वापरल्या जातात. त्यामुळे बदलापूरच्या बाजारपेठेत जंगली वनस्पतीतील औषधी पत्रींचा मोठा समावेश पाहायला मिळतो आहे. आदिवासींसाठी मोठा रोजगार असलेल्या या पत्रींची मागणीही गेल्या काही वर्षांत वाढली आहे.

चाकरमान्यांच्या शहरात गणशोत्सवाची तयारी अवघ्या काही दिवसांपूर्वी केली जाते. त्यामुळे पूजेतही अनेक नवे प्रकार पाहायला मिळतात. मात्र आजही अनेक घरांत पारंपरिक पूजा करण्याचा आग्रह असतो. अशामंध्ये सर्वाधिक वनस्पतींच्या पत्रीचा वापर केला जातो. बदलापूर शहर चौथ्या मुंबईकडे वाटचाल करीत असले तरी त्याला ग्रामीण भागाचा शेजार असल्याने आजही अनेक आदिवासी येथे औषधी वनस्पती असलेल्या पत्रींची विक्री करण्यासाठी येत असतात. या पत्रींमध्ये अनेक औषधी वनस्पतीही पाहायला मिळतात. बेलाची पाने, पिंपळ, दुर्वा, तुळस, माका, रुई, केवडा, अगस्ती, कन्हेर, जाई, धुणा, धापा, कळ्याची फुले अशा अनेक वनस्पतींचा त्यात समावेश असतो. दुंडय़ाच्या पानांमध्ये यांना एकत्रित ठेवण्यात येते. एकत्रित पत्रींची जुडी साधाणत: २० ते ३० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे. सर्वात महागडे पत्र केवडा असून दुर्वा आणि तुळस सर्वात स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात साधारणत: ३०० आदिवासी याची विक्री करताना दिसतात. हरतालिका, गणेश चतुर्थी, गौरी आवाहन आणि अनंत चतुर्दशी या दिवशी होणाऱ्या पूजेसाठी या पत्रींचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. दररोजच्या विधिवत पूजेतही या पत्री वापरल्या जातात. येत्या दहा दिवसांत या पत्रींच्या माध्यमातून आदिवासी लाखांची उलाढाल करणार असल्याचे बोलले जाते.

मंगळागौर आणि हरितालिका

कुमारिकांकडून साजऱ्या केल्या जाणाऱ्या हरतालिका आणि मंगळागौर अशा दोन्ही सणांसाठी वेगवेगळ्या वनस्पती वापरल्या जातात. हरितालिका साजरी करताना फक्त पत्रींचा वापर केला जातो. ज्या महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत तर मंगळागौरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पती या विवाहित स्त्रिया आणि त्यांची मुले यांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत. त्यांची लागवड करणे हा यामागचा प्रमुख हेतू आहे. मात्र लागवडीचा हेतू मागे पडत असून फक्त वापर केला जातो आहे.

पत्रींबाबत अज्ञान

गेल्या काही वर्षांत हौशी गणेशभक्तांची संख्या वाढल्याने घरगुती गणपतींची संख्याही वाढली आहे. मात्र त्याच वेळी विधिवत पूजा करीत असताना या औषधी वनस्पती आणि पत्रींचा वापर का आणि कशासाठी केला जातो, याची माहिती असणारे लोक कमी झाल्याचे समोर आले आहे. या दिवसांत व्यस्त असणाऱ्या भटजींच्या हातून होणाऱ्या पूजा साहित्यातही या पत्रींचा समावेश नसल्याने अनेकांना याबाबत माहिती नाही. पूर्वी या वनस्पतींचा वापर औषधी म्हणून केला जात होता. मात्र त्यांची उपयुक्तता मात्र कमी झालेली नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 3:18 am

Web Title: ganesh chaturthi 2017 puja materials
Next Stories
1 बाजाराच्या मनकामना पूर्ण!
2 गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज
3 बाजाराची मनकामनापूर्ती
Just Now!
X