गणपतीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत केले जाते. या दिवशी स्त्रिया ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सप्तर्शीचे पूजन करतात. ही पूजा केल्यानंतर महिला बैलांच्या श्रमातून पिकवण्यात आलेल्या धान्यापासून तयार करण्यात आलेले कोणतेही पदार्थ खात नाहीत. यावेळी केवळ हाताने कष्ट करुन पिकवलेले अन्न सेवन करावे असे मानले जाते. या दिवशी महिला दूध पीत नाहीत तसेच मीठही खात नाहीत. ऋषीमुनी अरण्यात रहायचे. अरण्यात उगवणारी कंदमुळे खाऊन ते आपले पोट भरायचे. त्याची आठवण म्हणून आपण एक दिवस तरी नैसर्गिकरित्या तयार झालेले अन्न खावे व हा दिन साजरा करावा असे मानले जाते.
जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ऋषीपंचमीचा सण साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ या सात ऋषींनी आपल्यासाठी ज्ञानाचे घडे भरून ठेवले आहेत. अशा या थोर ऋषींनी दाखविलेल्या मार्गावरून चालण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस मानला जातो.
अशी करा पूजा
सकाळी लवकर उठून आंघोळ करुन स्वच्छ कपडे घालावेत. याठिकाणी सप्तऋषींचा फोटो लावावा. याठिकाणी कलश ठेऊन त्याचीही पूजा करावी. हा कलश आणि फोटो यांची हळद, कुंकू, चंदन, फुले आणि अक्षता वाहून पूजा करावी. यानंतर ऋषीपंचमीची कथा वाचावी. यानंतर सप्तऋषींना मनोभावे नमस्कार करुन आपली काही चूक झाली असल्यास माफी मागावी. ही पूजा पुरुष आणि महिला दोघांनी करायची असते. मात्र सध्या केवळ महिलाच ही पूजा करतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 26, 2017 9:00 am