ध्वनी व जल प्रदूषण रोखण्यासाठी पालिका, पोलीस यंत्रणा सरसावली

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवातील उत्सवात कोणताही अनुचित प्रकार वा भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन व्यवस्था सज्ज झाली आहे. गणेशोत्सवात ध्वनी व जल प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणा पुढे सरसावली आहे. महापालिकेने या काळात प्रदूषण होणार नाही याकरिता सहा विभागात एकूण २८ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. तसेच पीओपींच्या मूर्तीचे अमोनियम बायकाबरेनेटच्या मिश्रणात घरच्या घरी विसर्जन करता यावे म्हणून सहा टन पावडर भाविकांना मोफत देण्यात येणार आहे.

गणेशोत्सवास शुक्रवारी सुरुवात होत असून शहर व परिसरात लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. गणपती बाप्पाला निरोप देताना प्रदूषण होणार नाही याकरिता पालिकेने व्यवस्था केली आहे. गणेश मूर्ती विसर्जनाची शहरात २६ नैसर्गिक ठिकाणे आहेत. गोदावरी, वालदेवी व दारणा नदीपात्रावरील ठिकाणांचा त्यात प्रामुख्याने अंतर्भाव आहे. मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यास प्रदूषण वाढते. यामुळे गणेश मूर्ती दान करण्याचा उपक्रम सामाजिक संस्थांच्या मदतीने राबविला जाईल. या मूर्ती संकलित करून नदीपात्राऐवजी अन्य ठिकाणी विधिवत त्यांचे विसर्जन केले जाते. या व्यतिरिक्त शहरात २८ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात नाशिक पूर्व विभागात सहा, नाशिक पश्चिम विभागात सात, पंचवटीत तीन, नाशिकरोड, नवीन नाशिक व सातपूर विभागात प्रत्येकी चार तलावांचा समावेश राहील.

नाशिक पूर्व विभागात रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामीनगर बसथांबा, शिवाजी वाडी पूल, साईनाथनगर चौफुली, कलानगर चौक, राजीवनगर. नाशिक पश्चिम विभागात चोपडा लॉन्स पूल, चव्हाण कॉलनी (परिचा बाग), येवलेकर मळा (बॅडमिंटन हॉल), दोंदे पूल, महात्मानगर पाण्याची टाकी, लायन्स क्लब गार्डन. पंचवटी विभागात आरटीओ कॉर्नर, गोरक्षनगरमधील दत्तचौक, कोणार्कनगर. नाशिकरोड विभागात जेतवननगर, शाळा क्रमांक १२३ चे मैदान, चेहेटी ट्रक टर्मिनस, नारायण बापूनगर. सातपूर विभागात सोमेश्वर मंदिर, शिवाजीनगर, अशोकनगर, पाईपलाईन रोड. तर नवीन नाशिक विभागात डे केअर शाळेजवळ, जिजाऊ वाचनालय, राजे संभाजी स्टेडिअम व पवननगर स्टेडिअमवर कृत्रिम तलाव राहणार असल्याचे शहर अभियंता यू. बी. पवार यांनी सांगितले.

दरम्यान, गणेश मूर्ती व सजावट साहित्य, खरेदी, देखावे, मंडप उभारणी, विद्युत रोषणाई केली जात आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक गणेश मंडळासह घरगुती गणपती बसविण्यासाठी सहकुटुंब नागरिक आणि बच्चे कंपनीने गर्दी केल्यामुळे बाजारपेठेत उत्साह संचारला.  घरोघरी व सार्वजनिक मंडळात उत्साहात लाडक्या दैवताचे स्वागत करण्याची लगबग सुरू आहे. गणेश मूर्ती व सजावट साहित्याच्या खरेदीने बाजारपेठ फुलली असून प्रत्येकाला बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे.

अमोनियम बायकाबरेनेटचे मोफत वितरण

पीओपीच्या मूर्ती अमोनियम बायकाबरेनेटच्या मिश्रणात घरच्या घरी विसर्जित करता येतात. प्रदूषण रोखण्यासाठी ही पावडर महापालिकेने मोफत स्वरुपात उपलब्ध केली आहे. पालिकेच्या सहा विभागीय कार्यालयात प्रत्येकी एक टन यानुसार सहा टन पावडर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती कमी पडल्यास आणखी पावडर आणण्याची तयारी आहे. या पावडरच्या साहाय्याने विसर्जन पद्धतीची माहिती देण्यात येणार आहे.

बेकायदेशीर वीज जोडणी घेऊ नये

शहरातील काही गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या पथदीप खांबावरून बेकायदेशीर जोडणी घेतात. या खांबावर वीज माळा टाकल्या जातात. यामुळे उपरोक्त भागात पथदीप बंद होण्याच्या तक्रारी वाढतात. बेकायदेशीर जोडणी घेताना, वापर करताना विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. यामुळे मंडळांनी बेकायदेशीर वीज जोडणी घेऊ नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.