News Flash

बाजाराच्या मनकामना पूर्ण!

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी जवळपास सर्वच बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या होत्या.

गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, गणपतीचे दागिने, फुले खरेदीसाठी झुंबड

भक्तांची विघ्ने दूर करून सर्वत्र सुखसमृद्धी निर्माण करणाऱ्या गणरायाच्या आगमनाच्या आधीचा दिवस बाजारात नवचैतन्य निर्माण करून गेला. नोटाबंदी, जीएसटी यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंदीचे चटके सोसत असलेल्या बाजारात गुरुवारी गणेशोत्सवानिमित्तच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. सजावटीची मखरे, रंगबिरंगी मण्यांच्या माळा, गणरायाची आभूषणे यांनी सजलेल्या बाजारात फुलांचा दरवळ वातावरण भारून टाकत होता. त्यातच गणेशमूर्ती नेण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सुरू असलेली घाई आणि त्यांच्या वाद्यांचा गजर यांनी बुधवारी वसई-विरारमधील वातावरण मंगलमय केले होते.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी जवळपास सर्वच बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या होत्या. पुजेच्या साहित्यासह सजावट, प्रसाद, फळे आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत वसईतील प्रमुख बाजारपेठांमध्ये गजबज पाहायला मिळाली. महागाईचे वारे वाहत असताना आणि अनेक वस्तूंना जीएसटी लागू झाल्याने त्यांच्या किमती वाढल्या असल्या तरीही गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ग्राहकांनी हात आखडता घेतला नाही. गणेशोत्सवात चिबूड, काकडी यांसह फळांचे व फुलांचे भाव वधारले असले तरी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कमी झालेली नव्हती.

फळे, फुले, भाज्या महागल्या

 • गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या चिबूड, काकडी यांसह फळे, फुलांचे भाव वधारले आहेत. गणेशोत्सव काळात लागणाऱ्या भाज्यांचे भाव १५ ते २० रुपयांनी तर फळांचे भाव हे २० ते ३० रुपयांनी कडाडले आहेत. सध्या बाजारात पडवळ, शिराळी, भोपळा, सुरण, कारले, टोमॅटो, कांदा, बटाट, भेंडी, गवार या भाज्यांचे भाव १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे उपवासासाठी वापरण्यात येणाऱ्या रानभाज्यांच्या किमतीत १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. या रानभाज्या निर्मळ, कळंब, अर्नाळा, वसई गाव या भागांतून आणल्या जातात.
 • पूर्व व पश्चिम पट्टय़ातून झेंडू, चाफा यांसह तगर कागडा, जास्वंद बाजारात आली आहेत. फुलांची मागणी वाढणार असल्याने त्याप्रकारे भावही वाढले आहेत. एका हार पूर्वी ६० ते ७० रुपयास मिळत होता, तो आता १०० ते २०० रुपयांस मिळत आहे. दुर्वाच्या जुडय़ा पूर्वी ५० रुपयांला मिळायच्या त्यांची किमंत १०० रुपये झाली आहे.
 • वसईत सध्या बाजारात राजेळी केळींना जास्त मागणी असून त्यांची आधी किंमत १६० रुपये डझन होती, मात्र आता २२० रुपये झाली आहे, तर वेलची केळी ८० रुपये, हिरवी केळी ५० रुपयांवर गेली आहेत. सफरचंद ,पेर, मोसंबी, डाळिंब यांच्या किमतीमध्ये किलोमागे ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली असल्याचे निर्मळ येथील फळ विक्रेत्या स्नेहल पाटील यांनी सांगितले.
 • सफरचंद : १८० रु
 • पेर : १६० रु
 • डाळिंब : १६० रु
 • संत्री, मोसंबी : २० रुपये नग
 • पपनिस : १०० रु नग
 • राजेळी केळी : २२० रु. डझन
 • फुलांचा हार : १०० ते १२० रु.
 • दुर्वाची जुडी : १०० रु.

गणेश पूजनासाठीचा मुहूर्त

श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजन करण्यासाठी शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी प्रात:कालपासून दुपारी मध्यान्ह समाप्तीपर्यंत म्हणजे दोन वाजून ३० मिनिटांपर्यंत शुभ वेळ असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या वर्षी पाचव्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याच्या दिवशी मंगळवार येत असला तरी त्याच दिवशी गणपती मूर्तीचे विसर्जन केले जावे. गणपती मूर्ती विसर्जनाचा व मंगळवारचा काहीही संबंध नसल्याचेही ते म्हणाले.

पुढच्या वर्षी १९ दिवस उशिराने आगमन

यंदा गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट रोजी आली आहे, परंतु पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १९ दिवस उशिरा म्हणजे १३ सप्टेंबर २०१८ रोजी होणार असल्याची माहितीही ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.पुढील काही वर्षांतील गणेश चतुर्थीचे दिवस व कोणत्या वर्षी अधिक महिना येणार त्याबाबत सोमण यांनी माहिती दिली.

 • सोमवार, २ सप्टेंबर २०१९
 • शनिवार, २२ ऑगस्ट २०२० (आश्विन अधिक मास)
 • शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१
 • बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२
 • मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ (श्रावण अधिक मास)
 • शनिवार, ७ सप्टेंबर २०२४
 • बुधवार, २७ ऑगस्ट २०२५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 3:17 am

Web Title: ganesh chaturthi 2017 vasai market in ganpati festival 2017
Next Stories
1 गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज
2 बाजाराची मनकामनापूर्ती
3 Ganesh Utsav 2017 : माहेरचा गणपती : गणपतींच्या दिवसातच माझ्या मुलाचा जन्म झाला- किशोरी शहाणे- विज
Just Now!
X