सजावटीच्या साहित्यासोबत नैवेद्याच्या पदार्थाच्या किमती चढय़ा

केंद्र सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) गणेशोत्सवानिमित्ताने केल्या जाणाऱ्या खरेदीवर या नव्या कराच्या महागाईचे सावट दिसू लागले आहे. गणेशोत्सवात खरेदी केले जाणारे मसाल्याचे पदार्थ तसेच मोदकासाठी लागणाऱ्या नारळाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते वीस रुपयांनी वाढल्या असल्याचे व्यापारी आणि ग्राहकांचे म्हणणे आहे. सजावटीच्या साहित्यावर २८ टक्के, तर गणपती अलंकारावर ३ टक्के वस्तू सेवा कर लागू झाल्याने गणरायाभोवतालची आरासही महाग झाली आहे.

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आठवडाभर आधीपासूनच ठाण्याच्या बाजारात ग्राहकांची गर्दी होत असते. सजावटीच्या साहित्यात चिनी मालाची खरेदी मोठय़ा प्रमाणात केली जाते. यंदा या सजावटीच्या साहित्यावर २८ टक्के वस्तू आणि सेवा कराची भर पडल्याने सजावटीच्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत, असा दावा व्यापारी करत आहेत. गणपती मखराच्या सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगीबेरंगी चिनी माळा गेल्या वर्षी ग्राहकांना ३० रुपयांपर्यंत विकल्या जात होत्या. यंदा या माळा ४० रुपयांनी विकल्या जात आहेत. वस्तू आणि सेवा कराच्या आकारणीचा हा  परिणाम आहे, अशी माहिती ठाण्यातील पवन डिस्पोजेबल दुकानाचे विक्रेते रितेश झा यांनी दिली. सजावटीचे साहित्य पूर्वी ज्या किमतीत विकले जात होते त्या किमतीत दुकानदारांना या वर्षी खरेदी करावी लागल्याने ग्राहकांना विकताना वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागत आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांनी नव्याने सजावटीचे साहित्य खरेदी करण्याकडे पाठ फिरवल्याचे ते म्हणाले. गणपतीसाठी हजार रुपये किमतीचा एखादा अलंकार असल्यास त्यावर १६० रुपये वस्तू सेवा कर भरावा लागत असल्याने दागिन्यांची किमती वाढल्या असल्याचे ठाण्यातील काही अलंकार विक्रेत्यांनी सांगितले.

नारळ, गूळही महाग

गणपतीच्या नैवेद्यात मोदकाला विशेष स्थान असले तरी यंदा नारळाच्या किमतीत वस्तू आणि सेवा करामुळे दहा रुपयांचा फरक पडला आहे. गुळावरदेखील ५ टक्के वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आल्याने दहा ते पंधरा रुपयांनी गूळ महाग झाला आहे. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात २० रुपयांनी विकला जाणारा चांगल्या दर्जाचा नारळ या वर्षी ३० रुपयांनी विकला जात आहे. तसेच एरवी ४५ रुपये किलो या दरात विकण्यात येणारा गूळ या वर्षी ६० रुपये किलोने विकण्यात येत आहे. त्यामुळे घरात मोदक बनवण्यासाठी यंदा खिशाला कात्री लावावी लागणार आहे. गेल्या वर्षी १२० रुपये किलो या दराने विकण्यात येणारे सुके खोबरे गणेशोत्सवात २०० रुपये किलो या दराने विकत असल्याचे ठाण्यातील एस.एस. मसाला मार्ट दुकानाचे मालक भोलाभाऊ यांनी सांगितले.

जेवणाच्या पंगतीही महाग

गणेशोत्सवात अनेक गृहिणी घरातील जुना मसाला न वापरता गणपतीच्या नैवेद्यासाठी नवीन मसाला तयार करतात. मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या मिरच्यांचे भावदेखील या वर्षी वाढले असल्याने गणेशोत्सवात पाहुण्यांच्या जेवण्याच्या पंगती महाग होणार असल्याचे चित्र दिसत आहे. मसाल्यासाठी वापरण्यात येणारी उत्तम दर्जाची बेडगी मिरची गेल्या वर्षी १४० रुपयांनी विकली जात होती. यंदा बेडगी मिरची २२० रुपये किमतीने विकली जात आहे. तसेच काश्मिरी मिरची गेल्या वर्षी २०० रुपयाने विकली जात होती. यंदा मात्र २४० रुपयांनी विकत असल्याचे मसाला विक्रेते गुलाब मेमन यांनी सांगितले.

साखरफुटाणे १२० रु. किलो

गणपतीच्या प्रसादामध्ये आवर्जून वापरले जाणारे चांगल्या दर्जाचे साखरफुटाणे गेल्या वर्षी ८० रुपये किलो या दराने विकले जात होते. यंदा गणेशोत्सवात १२० रुपये किलो या दराने फुटाणे विकले जात असल्याचे विक्रेते कादर मेमन यांनी सांगितले. वर्षभरात या वस्तूंच्या किमतीत वाढ अपेक्षित असतेच. मात्र, यंदाही वाढ ही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक आहे, असा दावा काही विक्रेत्यांनी केला.