यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा  व्हावा, यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालय आणि जनस्थान व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप यांनी एकत्रीतपणे एका लघुपटाची निर्मिती केली आहे. ‘नाशिक गणेश फेस्टिव्हल २०१७, उत्सव मांगल्याचा, नाशिककरांच्या अभिमानाचा’ असे या लघुपटाचे नाव आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि युट्यूबच्या माध्यमांतून हा लघुपट लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते बुधवारी लघुपट प्रदर्शित करण्यात आला. शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते  मंडपात आकर्षक देखावे आणि आरास करण्यात दंग झाले आहेत. गणेशोत्सवाच्या आगमनाच्या उत्साहात पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, यासाठी खबरदारी घ्यावी, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, असे आवाहन या लघुपटातून करण्यात आलाय. या लघुपटात बाप्पा सर्वांना पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेश देत आहे.  प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी कागद, पुठ्ठा आणि शाडू मातीच्या मूर्तीचा वापर करा, डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्य वापरा, गुलालाऐवजी फुलांचा वापर करा, असा संदेश देण्यात आलाय.

नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या लघुपटाची निर्मिती अभय ओझरकर आणि विनोद राठोड यांनी केली आहे. तर दिग्दर्शनाची जबाबदारी सचिन शिंदे यांनी पार पाडली. सदानंद जोशी यांनी यासाठी संहिता लिहिली असून मिलिंद गांधी यांच्या गीताला आनंद अत्रे यांनी आवाज दिला. तर धनंजय धुमाळ यांनी संगीत दिले आहे.