News Flash

जाणून घ्या दीड दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यामागची प्राचीन परंपरा

चतुर्थीच्या दिवशीचं मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम

मंडळांचे गणपती अकरा दिवस असले तरी अनेक घरगुती गणपती मात्र दीड दिवसांचेच असतात

गणपती म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. वर्षभर आपण बाप्पांची केवढ्या आतुरतेनं वाट पाहत असतो ना! बाप्पांच्या आगमनाची तयारी अगदी महिनाभर आधीपासून घराघरांत सुरू झालेली असते. बाप्पासाठी मखर, फुलांची आरास, नैवेद्य सारी लगबग असते. ११ दिवस गणेशोत्सवाची धूम असते. जरी मंडळांचे गणपती अकरा दिवस असले तरी अनेक घरगुती गणपती मात्र दीड दिवसांचेच असतात. तेव्हा बऱ्यापैकी घरगुती बाप्पांचं विसर्जन दीड दिवसांनी झालेलं असतं. आता दीड दिवसांनी बाप्पाचं विसर्जन करण्याची कारणं वेगवेगळी असतात. अनेकांना वेळ नसतो, मुलं कामाला जाणारी असतात तेव्हा बाप्पांची दहा दिवस काही सेवा करता येत नाही. ही कारणं असली तरी दीड दिवसानं मूर्ती विसर्जन करण्यामागची परंपरा काही वेगळीच आहे.

प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यामागची एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तेव्हा भाद्रपद महिन्यात साधारणं चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानले जातात. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची. पूजा केल्यानंतर त्याचदिवशी या मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जायचं. नंतर जस जशी वर्षे जाऊ लागली तसा या परंपरेत बदल होऊ लागला. अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवस गणपती पूजनचा पायंडा पडू लागला. मात्र अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचं विसर्जन करण्याची प्रथा आजतागत कायम ठेवण्यात आलीये. विशेष करून दक्षिणेकडील अनेक गावांत चतुर्थीच्या दिवशीचं मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 5:00 pm

Web Title: ganesh ganapati emmersion visarjan 2017 history celebration in mumbai and maharashtra marathi
Next Stories
1 Ganesh Chaturthi 2017: गणपती माझा नाचत आला!; मुंबई, पुण्यासह अवघा महाराष्ट्र भक्तीरसात चिंब
2 Ganesh Utsav 2017: जाणून घ्या गणपतीच्या या रुपांविषयी…
3 Ganesh Utsav Recipes 2017 : काजूकंद
Just Now!
X