मंगलमय आनंदयात्रेचा ‘श्रीगणेशा’; मानाच्या गणपतींची वाजत-गाजत मिरवणूक

विविध तालांचा आविष्कार घडविणाऱ्या ढोल-ताशावादकांचा निनाद.. मधूर सुरांची बरसात करणारे बँडपथकांचे वादन.. ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘जय गणेश’चा जयघोष.. गणेश मूर्तीचे दर्शन डोळ्यात साठवून ठेवण्याबरोबरच कॅमेरे आणि स्मार्टफोनमधून गणरायाची छबी टिपण्यासाठी नागरिकांची सुरू असलेली लगबग.. अशा उत्साही वातावरणात निघालेल्या मिरवणुकांनी बारा दिवसांच्या मंगलमय आनंदयात्रेचा शुक्रवारी ‘श्रीगणेशा’ झाला. गणरायाच्या स्वागतासाठी आलेल्या पावसामुळे भाविकांचा आनंद दुणावला.

लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष हे यंदाच्या गणेशोत्सवाचे खास वैशिष्टय़ आहे. गणरायाच्या आगमनाचे पावसानेही सकाळपासूनच स्वागत केले. अधूनमधून बरसणाऱ्या सरींमुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. सकाळीच घरातील गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर ढोल-ताशापथकांमध्ये वादन करणारे युवक-युवती आणि मंडळांचे कार्यकर्ते पारंपरिक पेहराव करून मिरवणुकीसाठी सज्ज झाले. ढोल-ताशापथकांच्या वादनाने मिरवणुकांमध्ये अनोखा रंग भरला गेला.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता उत्सव मंडपापासून सुरू झाली. बुधवार चौक, जोगेश्वरी चौक, अप्पा बळवंत चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिर या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली.  शिवछत्रपती, समर्थ, श्रीराम आणि उमग या चार ढोल-ताशा पथकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग होता. महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता गणपतीची प्रतिष्ठापना झाली.

अखिल मंडई मंडळ

अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची मिरवणूक सकाळी दहा वाजता उत्सव मंडपापासून सुरू झाली. ‘बेटी बचाओ-बेटी बढाओ’ आणि ‘स्त्रीभ्रूणहत्या टाळा’ असा सामाजिक संदेश देणाऱ्या नूमवि मुलींच्या प्रशालेच्या विद्यार्थिनी, प्रशालेचे ढोल-ताशापथक आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणूक सुरू असताना पावसाच्या जोरदार सरींनी पुनरागमन केलं. मिरवणूक आणि वाद्यवादन मात्र उत्साहात सुरूच होतं. शारदा-गजाननाची मूर्ती पावसात भिजू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यावर प्लास्टिकचं आवरण धरून ठेवले होते. मंडई पोलीस चौकी, टिळक पुतळा, रामेश्वर चौक, गोटीराम भय्या चौक, झुणका-भाकर केंद्रमार्गे मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी आणि गीता कुलकर्णी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता शारदा-गजाननाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.

हुतात्मा बाबू गेनू मंडळ

फुलांनी सजविलेल्या शेषनाग रथामध्ये विराजमान हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरू झाली. महात्मा फुले मंडई चौक, शनिपार चौक, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक, रामेश्वर चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली. रुद्रगर्जना, नादब्रह्म, शिवतेज ग्रुप आणि श्रीराम पथक ही चार ढोल-ताशापथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. माजी नगरसेवक शिवा मंत्री आणि उद्योजक सौरभ कुलकर्णी यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली.

पुणे फेस्टिव्हल

नेहरू स्टेडियम येथील हॉटेल सारस येथे पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाली. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, आयली घिया, सुरेश कलमाडी, कृष्णकांत कुदळे, डॉ. सतीश देसाई, काका धर्मावत, बाळासाहेब अमराळे या वेळी उपस्थित होते.

कसबा गणपती  

पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी सव्वादहा वाजता उत्सव मंडपापासून सुरुवात झाली. हमालवाडा येथील नीलेश पार्सेकर यांच्याकडून उत्सवमूर्ती घेऊन आप्पा बळवंत चौक, तांबडी जोगेश्वरी चौक, बुधवार चौक आणि लाल महाल या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात आली. देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, आदिमाया ढोल-ताशापथक, नवीन मराठी शाळेचे लेझीमपथक आणि प्रभात बँडपथक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. सांगली येथील संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते ११ वाजून ५६ मिनिटांनी गणपतीची प्रतिष्ठापना झाली. मंडळाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने १२५ सुवासिनींनी गणपतीचे औक्षण केले. मंडळातर्फे उत्सवामध्ये सायबर गुन्ह्य़ांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

केसरीवाडा

केळकर रस्त्यावरील मूर्तिकार गोखले यांच्याकडून उत्सवमूर्ती घेतल्यानंतर श्री केसरीवाडा या मानाच्या पाचव्या गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून निघाली. बिडवे बंधू यांचे सनई-चौघडावादन मिरणुकीच्या अग्रभागी होते. श्रीराम ढोल-ताशापथक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. केसरी-मराठा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना झाली. उत्सव काळात केसरीवाडा येथे दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दगडूशेठ हलवाई ट्रस्ट

‘मोरया मोरया’च्या जयघोषात पुष्परथातून निघालेल्या मिरवणुकीने वाजतगाजत ब्रह्मणस्पती मंदिरातील गाभाऱ्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे गणराय विराजमान झाले. त्यापूर्वी मंदिरापासून सकाळी पावणेनऊ वाजता निघालेली  मिरवणूक जोगेश्वरी चौक, आप्पा बळवंत चौक, लिंबराज महाराज चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा चौक, हुतात्मा बाबू गेनू चौक या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपामध्ये आली. देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, मानिनी हे महिलांचे ढोल-ताशापथक, दरबार आणि स्वरझंकार ही बँडपथके मिरवणुकीमध्ये सहभागी झाली होती. भगव्या अक्षरात ‘जय गणेश’ लिहिलेल्या टोप्या परिधान केलेले आणि अष्टगंधाचा टिळा लावलेले कार्यकर्ते भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. त्र्यंबकेश्वर येथील गोरक्षनाथ मठाचे पीरयोगी गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते सकाळी १० वाजून ९ मिनिटांनी श्रींची विधीवत प्रतिष्ठापना झाली. मििलद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

तुळशीबाग मंडळ

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव या मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक सकाळी दहा वाजता उत्सव मंडपापासून सुरू झाली. लोणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा अग्रभागी होता.  नूमवि, नादब्रह्म, श्री महादुर्गा आणि उगम या ढोल-ताशापथकांच्या वादनाला भाविकांनीही ताल धरला. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये विराजमान महागणपतीची मूर्ती पाहताना भाविकांचे डोळे दिपून गेले. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता गणपतीची प्रतिष्ठापना झाली.

तांबडी जोगेश्वरी मंडळ

शनिवार पेठ येथील गोखले मूर्तिकार यांच्याकडून उत्सवमूर्ती घेतल्यानंतर ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची सकाळी साडेदहा वाजता मिरवणूक सुरू झाली. आढाव बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, शिवमुद्रा आणि ताल या ढोल-ताशापथकांसह न्यू गंधर्व ब्रास बँड मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. पारंपरिक चांदीच्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाली होती. मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षी व्यापारी समीर शहा यांच्या हस्ते दुपारी सव्वाच्या सुमारास गणपतीची प्रतिष्ठापना झाली.