28 January 2020

News Flash

Ganesh Utsav 2017 : आमचा लाडोबा गणपती- उषा नाडकर्णी

'बाप्पासोबतचं नातं शब्दांत मांडता येणार नाही.'

उषा नाडकर्णी

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे दहा दिवस प्रत्येकासाठीच विशेष असतात. गणरायाचं आगमन, पूजा, आरत्या, भजने यांमुळे वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं. रोजची धावपळ सोडून प्रत्येकजणच बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होतात. आपली सर्व सुखदु:ख विसरुन बाप्पाची आराधना करतात. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यासुद्धा गणेशोत्सवात रोजची शूटिंगची धावपळ बाजूला ठेवून मनोभावे गणरायाची पूजा अर्चना करतात. यावेळी त्यांच्या माहेरच्या गणपतीच्या काही आठवणीही त्यांनी व्यक्त केल्या.

‘माझ्या भावाच्या घरी पाच दिवसांकरिता बाप्पाचे आगमन होते. बाप्पाला मी लाडोबा गणपती असंच म्हणते. प्रसारमाध्यमातील लोक असोत किंवा मित्रमंडळी मी सर्वांना आमच्या लाडोबा गणपतीच्या दर्शनाला या असंच म्हणते. गणेशोत्सवामध्ये मिळणारी ऊर्जा आणि सकारात्मकता वेगळीच असते. फक्त मीच नव्हे तर आपल्या भारतात काय किंवा जगात कुठेही हिंदू माणूस गणपतीवर अतोनात प्रेम करतो. मग बाकीच्या देवांना मानत नाही असंही नसतं. पण बाप्पासोबतचं नातं हे वेगळंच असतं. हे नातं मला शब्दांत मांडता येणार नाही,’ असं त्या म्हणतात.

वाचा : माहेरचा गणपती : मालवणी भाषा एवढी ऐकायचे की ती वर्षभर पुरायची- नेहा राजपाल

गणेशोत्सवात उषा नाडकर्णी दरवर्षी मुंबईतील जीएसबी गणपतीच्या दर्शनाला आवर्जून जातात. यंदा त्यांच्या माहेरीच्या गणपतीची मूर्तीसुद्धा जीएसबी गणपतीसारखीच आहे. याविषयी ते पुढे म्हणतात की, ‘यंदा आमचा घरचा गणपतीसुद्धा असाच नटलेला आहे. मुकूट, सोंड, हातातील कमळ, परशू, अगदी सर्व सारखंच आहे. दरवर्षी आम्ही बाप्पाची वेगवेगळ्या स्वरुपातील मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. लाडोबा गणपतीच्या मागे मोठा आरसा ठेवतो. समोर मोठा चौरंग आणि मग चांदीच्या पाटावर बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो. फुलांनी थोडीशी सजावटही करतो. या पाच दिवसांमध्ये पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गणहोम करतो. तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असते. चौथ्या दिवशी रंगपूजा आणि मग पाचव्या दिवशी विसर्जन पूजा. अशा पद्धतीने बाप्पाला निरोप दिला जातो. माझ्या गावच्या घरीसुद्धा गणपतीची प्रतिष्ठापना होते. पण तिथे जाता येणं शक्य होत नसल्याने आम्ही मुंबईत आमच्या घरी गणपती आणू लागलो.’

शब्दांकन- स्वाती वेमूल
swati.vemul@indianexpress.com

First Published on September 4, 2017 1:20 am

Web Title: ganesh utsav 2017 marathi actress usha nadkarni talking about ganapati festival
Next Stories
1 Ganesh Utsav Recipes 2017 : केळीचे मोदक
2 दोन एकर शेतात विराजमान झाले इको फ्रेंडली गणपती बाप्पा!
3 Ganesh Utsav Recipes 2017 : नाचणी फ्रूट रोल
Just Now!
X