गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचा गोंधळ

समुद्र आणि तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून गेल्या काही वर्षांपासून पालिकेतर्फे उभारण्यात येणारा महापौर बंगल्यातील कृत्रिम तलाव वाढत्या गर्दीमुळे स्थलांतरित करण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची महापौर दर्शनासाठी गर्दी लोटू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. तर महापौर निवासस्थानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्यामुळे येथील कृत्रिम तलाव स्थलांतरित करण्यात आल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने समुद्र आणि तलावामध्ये होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हे महापौर निवासात कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते.गेल्या काही वर्षांमध्ये महापौर निवासस्थानातील कृत्रिम तलावात गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे महापौर निवासस्थानी गोंधळ उडू लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन यंदा महापौर निवासस्थानातील कृत्रिम तलाव स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पालिकेतील काही अधिकाऱ्यांना त्याची गंधवार्ताही नव्हती. पालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत उभारलेल्या कृत्रिम तलावांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये महापौर निवासस्थानातील कृत्रिम तलावाचा समावेश होता.

महापौर बंगल्यातील कृत्रिम तलाव शेजारीच्या पालिका क्रीडा भवनाच्या आवारात स्थलांतरित करण्यात आला आहे.दीड दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या निमित्ताने अनेक भाविक शनिवारी महापौर बंगल्यामध्ये दाखल होऊ लागले. मात्र येथे कृत्रिम तलाव नसल्याचे कळताच त्यांचा गोधळ उडाला. कोणतीही कल्पना न देताच महापौर बंगल्यातील कृत्रिम तलाव स्थलांतरित करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

भाविकांना गणेश विसर्जनासाठी गैरसोय होऊ नये म्हणून महापौर बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रीडा भवनाच्या आवारात कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. कृत्रिम तलावात मोठय़ा संख्येने गणेश विसर्जन होऊ लागले आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने भाविक येतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.  – विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

यंदा महापौर निवासस्थानी कृत्रिम तलाव उपलब्ध नसेल याची गणेशभक्तांना कल्पना द्यायला हवी होती. पालिकेतील सत्ताधारी नागरिकांना गृहीत धरून त्यांच्यावर आपले निर्णय लादत असतात. त्याचेच हे एक उदाहरण आहे.    – रवी राजा, विरोधी पक्षनेता

भाविकांची भेट महापौरांना अडचणीची वाटू लागली आहे. म्हणूनच गेली अनेक वर्षे महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेला कृत्रिम तलाव अचानक स्थलांतरित करण्यात आला. निवडणुकांच्या काळात मतदारांना गोंजारायचे आणि नंतर लाथाडायचे असाच हा प्रकार आहे.   संदीप देशपांडे, मनसे