15 January 2021

News Flash

गणरायांचे आगमन जल्लोषात, जलधारांनीही हजेरी लावली

‘नागपूरचा राजा’, ‘महालचा राजा’ ची प्रतिष्ठापना सकाळी करण्यात आली.

‘विदर्भाचा राजा’ : एकता गणेश मंडळाच्या ‘विदर्भाचा राजा’च्या मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (लोकसत्ता छायाचित्र)

युवकांमध्ये उत्साह, गुलालाची उधळण

गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. असा जयघोष करीत घरगुती आणि सार्वजानिक गणेश मंडळांच्या गणरायाचे आज ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाच्या उधळणीत जल्लोशात आगमन झाले. गणरायाच्या स्वागतासाठी आज जलधारांनीही हजेरी लावली.

लाडक्या गणरायाला नेण्यासाठी सकाळपासूनच गणेशभक्तांनी चितार ओळीसह शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. आबालवृद्ध डोक्याला भगवी पट्टी बांधून ढोल-ताशांच्या निनादात नाचत होते. सकाळी घरघुती गणपतीची प्रतिष्ठापना झाली. दुपारनंतर जलधाराही बाप्पांच्या स्वागतासाठी बरसल्या. त्यामुळे विक्रेत्यांची आणि गणेशभक्तांची तारांबळ उडाली. मात्र, उत्साहावर किंचितही परिणाम जाणवला नाही.

‘नागपूरचा राजा’, ‘महालचा राजा’ ची प्रतिष्ठापना सकाळी करण्यात आली. दुपारी चारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मूर्ती प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली. वाजतगाजत मिरवणुकांचे चित्र शहराच्या सर्वच भागात दिसून येत होते. पाऊस सुरू झाला असताना गणपतीच्या मूर्तीवर प्लास्टिक झाकून ‘मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करीत कोणी कारमध्ये तर कोणी मोठय़ा वाहनांमध्ये मूर्ती घेऊन जात होते.

‘राजाराम’चे सामाजिक प्रबोधन

गणेशोत्सवाला बाजारी स्वरूप आल्याच्या पाश्र्वभूमीवर सीताबर्डीवरील राजाराम वाचनालयाच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाने मात्र भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचा पायंडा पाडला आहे. तब्बल १२४ वर्षांची परंपरा या गणेश उत्सवाला आहे. समाजप्रबोधनासोबतच देशापुढे वेळोवेळी उभे राहिलेल्या कठीण प्रश्नावर मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमातून प्रतिबिंबित केले जातात. राजकीय पुढारी, नामांकित साहित्यिक, वक्ते व कलावंतांनी यापूर्वी येथे भेटी दिल्या आहेत. केवळ गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून न थांबता समाज प्रबोधन साधण्याचा प्रयत्न वाचनालयाकडून केला जातो. डीजेच्या कलकलाटात ध्वनिप्रदूषण होण्यापेक्षा वैचारिक देवाणघेवाण होऊन समाजप्रबोधन करावे, या उद्देशाने वाचनालयातर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे कार्य सुरू असल्याचे मुकुंद नानीवडेकर यांनी सांगितले.

सामाजिक संदेश देणारे देखावे

शहरातील काही मंडळांनी यंदा सामाजिक संदेश देणारे देखावे तयार केले आहेत. विशेषत: गेल्या काही दिवसात चीन आणि भारतामधील असलेले तणावाचे संबंध बघता चिनी वस्तूवर बहिष्कार टाका, असे आवाहन करणारे संदेश वर्धमाननगर आणि रेशीमबाग परिसरात देखाव्याद्वारे देण्यात आले आहे. याशिवाय वृक्षारोपण आणि रक्तदानाचा संदेश देणारे देखावे व मंदिराच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत.

मेट्रोच्या कामाचा फटका

सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवर मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावर वाहने ठेवण्यास यंदा पोलिसांनी बंदी घातली. त्यामुळे गणेशभक्तांना चितार ओळीपासून सुमारे अर्धा किमी दूर वाहने ठेवावी लागली. मोठय़ा मूर्ती नेण्यासाठी चांगलीच अडचण झाली. मौदा येथील सार्वजानिक मंडळाची मूर्ती गर्दीत धक्का लागल्याने खाली पडली. तात्काळ दुसरी मूर्ती उपलब्ध होऊ न शकल्यामुळे मंडळाला संबंधित मूर्तीकारांकडे प्रतीक्षा करावी लागली आणि आर्थिक भुर्दंड बसला.

सलून अन् दवाखान्यातही मूर्ती विक्री

चितार ओळीत मूर्तीकारांची संख्या कमी झाली असून जुन्या मूर्तीकारांनी त्यांची घरे विकली आहेत. त्यामुळे येथे मूळ मूर्तीकार कमी आणि भाडोत्री अधिक अशी स्थिती आहे. मूर्ती खरेदीसाठी नागपूरकरच नव्हे तर विविध जिल्ह्य़ातून येथे नागरिक येत असल्याने अनेक मूर्ती विक्रेते गणेशोत्सवापूर्वी येथे जागा भाडय़ाने घेतात. या काळात दरही वधारलेले असतात. शुक्रवारी चितार ओळीत एका सलून तसेच एका दवाखान्यातून गणपती मूर्तीची विक्री केली जात असल्याचे आढळून आले.

मूषक  ५०० रुपयाला

गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाची (उंदीर) मागणी वाढल्याने त्यांच्या किंमतीतही घसघशीत वाढ झाली. एरवी २० ते ४० रुपयाला मिळणारे मोठय़ा आकाराच्या मूषकाची विक्री एका विक्रेत्याने ५०० रुपयाला केली. चितार ओळीत लहान मुले मूषक विक्रीसाठी फिरत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2017 1:12 am

Web Title: ganpati bappa arrival in nagpur with enthusiasm
Next Stories
1 ‘डॉल्बी’ला फाटा देत सांगलीत गणेशाचे स्वागत
2 कोल्हापुरात वाद्यांच्या निनादात गणरायाचे जल्लोषात स्वागत
3 मोरयाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमली 
Just Now!
X