बेलापूरमधील ठाकूर कुटुंबीयांची परंपरा; १५२ वर्षांची लाडकी गौराई

गौरी-गणपतीची प्रथा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवला जाणारा वसा. पण बेलापूरमधील पारसिक येथे राहणाऱ्या ठाकूर कुटुंबाने ही परंपरा तब्बल १५२ वर्षे जपली आहे. या गौरीचे वैशिष्टय़ म्हणजे इथे गौरीच्या एकाच पाच फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी दर ५० वर्षांनी मूर्ती विसर्जित केली जाते.

जयंत ठाकूर हे गौरीची परंपरा जपणारे पाचव्या पिढीतील सदस्य. हे कुटुंब मूळचे मुंबईतील शीव-चुनाभट्टी येथील आहे. १५२ वर्षांपूर्वी डोंगरी येथे जयंत ठाकूर यांचे पणजोबा बेंडू ठाकूर यांनी गौरी आणायला सुरुवात केली. त्यानंतर बाळाची ठाकूर, पुंडलिक ठाकूर व गंगाबाई ठाकूर, महादेव ठाकूर आणि आता जयंत ठाकूर यांच्याकडे हा वसा आला आहे. याआधी १९६४ साली दादर येथील रणजित स्टुडिओत साकारण्यात आलेल्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गौरीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर ५० वर्षांनी २०१४ ला त्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. गौरीचा उत्सव झाल्यानंतर मूर्ती पुढच्या वर्षीसाठी जपून ठेवली जाते. ठाकुरांच्या घरी विराजमान होणारी गौरी ही पाच फूट उंचीची असून तिच्यासाठी त्यांनी चांदीचे आसनही बनवले आहे.

गेल्या १५० वर्षांत कुटुंब विस्तारत गेले. कुटुंबीय मुंबई व आसपासच्या शहरांत विखुरले गेले; परंतु लाडक्या गौराईच्या पूजेसाठी संपूर्ण ठाकूर कुटुंब एकत्र येते. गौरी विसर्जनाच्या दिवशी सुपामध्ये पूजेचे व ओवशाचे साहित्य ठेवून ओवसे घेतले जातात. तीन दिवसांच्या या उत्सवातील फुले, फळे व इतर साहित्याचे विसर्जन केले जाते. कुटुंबीय स्वतच फुलांची पर्यावरणस्नेही आरास करतात.

अळणी भाजी-भाकरी

गौरीच्या उत्सवाची तयारी ठाकूर कुटुंबीय महिनाभर आधीच सुरू करतात. दर वर्षी कुटुंबातील एक जण गौरीला साडी आणते आणि तिची सेवा करते. यंदा ठाकुरांच्या गौराईला पेशवाई पद्धतीची साडी नेसवली जाणार आहे.

मंगळवारी गौरीचे आगमन झाल्यावर पहिल्या दिवशी तिला तांदळाची भाकरी व चवळी- माठाची अळणी भाजी असा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या म्हणजेच गौरीपूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. बदलत्या काळासोबत दुसऱ्या दिवशीच्या सोहळ्यात पुरणपोळीसोबत मिठाईच्या विविध प्रकारांची रेलचेल वाढू लागली आहे, तर गौरीच्या तिसऱ्या दिवशी गौरीला गोड निरोप देण्यासाठी खीर-पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. गौरीच्या या पाहुणचाराची परंपराही १५२ वर्षांपासून कायम आहे.

यंदा आमच्या गौराईचे १५३वे वर्ष आहे. उत्सवाच्या उत्साहात पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी आम्ही नेहमी काळजी घेतो. सजावटीसाठी नैसर्गिकरित्या विघटन होऊ शकेल, अशा साहित्याचाच वापर कटाक्षाने करतो. मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असते. त्यामुळे आम्ही तिचे दर ५० वर्षांनी विसर्जन करतो. दीडशे वर्षांत विस्तारलेले ठाकूर कुटुंब गौरीसाठी एकत्र येते. त्यामुळे कामांच्या धबडग्यातही स्नेहबंध जपले जातात.

– स्नेहा जयंत ठाकूर