29 September 2020

News Flash

पर्यावरणस्नेही विसर्जन!

बादलीच्या तळाशी कॅल्शियम काबरेरेटचा थर जमा होतो. हे तयार झालेले द्रावण दोन दिवस बाजूला ठेवावे.

गणेशमूर्तीचे विसर्जन नदी, तलाव, विहिरी यात केल्यामुळे निसर्गाची पर्यायाने पर्यावरणाची हानी होते

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन नदी, तलाव, विहिरी यात केल्यामुळे निसर्गाची पर्यायाने पर्यावरणाची हानी होतेच, पण त्याचबरोबर पाण्यातील जलचरांसाठीही ते धोकादायक ठरते. त्यामुळे नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात पर्यावरणस्नेही/पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ गेल्या काही वर्षांपासून जनजागृतीचे काम करत आहे.

*  पाण्यात न विरघळणारे/ विघटन न होणारे कोणकोणते घटक आहेत?

प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात विरघळत नाही. तसेच सिमेंट व प्लास्टिक हेही पाण्यात न विरघळणारे घटक आहेत. त्यामुळे गणपती मूर्ती तयार करताना व आरास/ सजावटीमध्ये यांचा वापर केला जाऊ नये. हे घटक टाळावे.

* पर्यावरणाला हानीकारक असे कोणते रंग किंवा घटक वापरले जातात?

क्रोमियम, लेड, मक्र्युरी, कॅडियम आदी घातक घटक या रासायनिक रंगांमध्ये असतात, तसेच सल्फर, फॉस्फरस, मॅग्नेशियम या घातक गोष्टींचाही वापर यात केलेला असतो. हे सर्व घटक पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे ते पर्यावरण व निसर्गासाठी घातक आहेत.

शाडूच्या मूर्तीवर भर हवा

प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणपती मूर्तीचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे, तसेच मूर्ती रंगविताना रासायनिक रंगांऐवजी कुंकू, हळद किंवा तत्सम नैसर्गिक रंगाचा वापर करावा.

विसर्जन घरच्या घरी कसे करता येईल?

गणपती मूर्तीच्या उंचीप्रमाणे मोठा टब/बादली घेऊन आपल्या घराच्या गॅलरीत, गच्चीत किंवा आवारात गणपती विसर्जन करू शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहा इंचांपर्यंतच्या मूर्तीसाठी सुमारे दहा लिटर क्षमता असलेली बादली वापरता येईल. बादलीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात अमोनियम बाय काबरेनेट घालून पूर्ण विरघळवा. ४८ तासांत मूर्ती पाण्यात विरघळते. बादलीच्या तळाशी कॅल्शियम काबरेरेटचा थर जमा होतो. हे तयार झालेले द्रावण दोन दिवस बाजूला ठेवावे. म्हणजे कॅल्शियम काबरेरेटचा थर पाण्यापासून वेगळा होईल. नंतर मूर्ती विरघळून तयार झालेल्या पाण्यात (अमोनियम सल्फेट) आणखी पाणी मिसळून ते झाडांना खत म्हणून घालता येऊ शकते.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन केल्याने जलचरांना कशा प्रकारे धोका निर्माण होतो?

मुळात प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे यापासून तयार केलेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर हे प्लास्टर ऑफ पॅरिस आणि मूर्तीचे घातक रासायनिक रंग पाण्यातील मासे, अन्य जलचर यांच्या शरीरात जातात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. पाण्यातील वनस्पतींसाठीही प्लास्टर ऑफ पॅरिस आणि हे रासायनिक रंग धोकादायक आहेत. त्यामुळे विहिरी, तलाव, नदी, समुद्र यातील जलचरांसाठी ते घातक ठरते.

भाविकांचा प्रतिसाद कसा ?

हळूहळू का होईना लोकांना पर्यावरणपूरक/पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची संकल्पना पटायला लागली आहे. त्यामुळे समाजात जनजागृती होत असून काही जण वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाकडे वळले आहेत. यातूनच घरच्या घरी गणपती मूर्तीचे विसर्जन करण्याकडे कल हळूहळू वाढीस लागला आहे. या संकल्पनेचा लोक स्वीकार करू लागले आहेत. आपल्या संस्कृतीतही मातीपासून तयार केलेल्या पार्थिव गणेशमूर्तीचे पूजन करावे असे सांगितले आहे. आपली संस्कृती ही पर्यावरणपूरक/पर्यावरणस्नेहीच राहिलेली आहे. त्यामुळे आपला गणेशोत्सव हा जास्तीत जास्त पर्यावरण व निसर्गाला पूरक असाच असला पाहिजे.

पर्यावरणपूरक/पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी आणखी काय केले पाहिजे?

गणेशोत्सवाच्या काळात फटाके वाजवून तसेच ‘डीजे’लावल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वायू व ध्वनिप्रदूषण होत असते. त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे ध्वनी व वायुप्रदूषण करणारे फटाके खरे तर लावले जाऊच नयेत. पण ते लावायचेच असतील तर प्रदूषण करणाऱ्या आवाजी फटाक्यांऐवजी शोभेचे फटाके लावले जावेत. आवाजाचा वापर मर्यादित राहील याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठमोठय़ा मूर्तीऐवजी कमी उंचीच्या व शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचा वापर मोठय़ा प्रमाणात झाला पाहिजे. गणपती मूर्तीचे विसर्जन करताना निर्माल्य किंवा सजावटीसाठी वापरलेल्या व पर्यावरणाला हानीकारक असलेल्या वस्तू गणपती मूर्तीसह पाण्यात विसर्जित करणे अयोग्य आहे. महापालिका प्रशासन किंवा अन्य स्वयंसेवी संस्थांकडून विसर्जन ठिकाणी निर्माल्य कलश ठेवलेले असतात. गणपतीला वाहिलेली फुले, हार त्या निर्माल्य कलशात टाकून त्यानंतरच मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे.

संकलन: शेखर जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 2:25 am

Web Title: maharashtra state pollution control board awareness on eco friendly ganesh immersion
Next Stories
1 उत्सवी धिंगाण्यात गाण्यांचा बाज बदलला
2 लालबागच्या गणपती दर्शनाला तारकामंडळ
3 माहेरचा गणपती : उत्सवाच्या अतिरेकापेक्षा मनोभावे पूजा महत्त्वाची- अनुराधा राजाध्यक्ष
Just Now!
X