X

Ganesh Utsav 2018 : जाणून घ्या कधी आणि कशी कराल गणेश प्रतिष्ठापना

घरच्या घरी अशी करा बाप्पाची प्रतिष्ठापना

गणपती हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यामुळे गणेशोत्सव तर बाप्पाच्या भक्तांसाठी मोठा सोहळाच. मात्र गणपतीची प्रतिष्ठापना शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करायची याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. अनेकदा ऐनवेळी गुरुजीही मिळत नाहीत. ऑफीसला सुटी नसणे आणि इतर काही कारणांमुळे आपल्यालाच गणपतीची स्थापना करावी लागते. अशावेळी आपल्याला पूजेची योग्य ती माहिती असल्यास त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो.

याबाबत पंचांगकर्ते दा.कृ. सोमण म्हणाले, गणेश चतुर्थीच्या दिवशी दिनांक १३ सप्टेंबर रोजी मध्यान काळ हा प्रशस्त मानला जातो. ११.२१ वाजल्यापासून ते १.४८ वाजेपर्यंत मध्यानकाळ आहे. यावेळेत ज्यांना काही कारणाने गणेशपूजन शक्य होत नसेल त्यांनी पहाटे ४ वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत गणेशपूजन करायला हरकत नाही. स्नान करुन घरातील देवांची पूजा करुन नंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करावी. घरच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना कशी करावी, त्याची योग्य ती पद्धत काय आहे याविषयी….

साहित्य –

हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी १०, खारीक ५, बदाम ५, हळकुंड ५, अक्रोड५, ब्लाउज पीस १, कापसाची वस्त्रे, जानवी जोड २, पंचा १, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार १, आंब्याच्या डहाळे, नारळ २, फळे ५, विड्याची पाने २५, पंचामृत, कलश २, ताम्हण १, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.

इतर तयारी –

१. गणेशाची मूर्ती शक्यतो आदल्या दिवशी आणून ठेवावी

२. मूर्ती मखरात ठेवावी, सर्व पूजेचे साहित्य तयार ठेवावे

३. बसण्यासाठी आसन किंवा बेडशीट

४. घरात वादविवाद न करता प्रसन्नपणे सर्वांनी एकत्र असावे.

५. देवासाठी काहीही समर्पण करताना ते उजव्या हातानेच वाहावे.

६. मूर्तीवर पाणी, पंचामृत, अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वांनी वाहावे

७. वडीलधाऱ्यांपैकी एकाने पूजा सांगावी. दुसऱ्या व्यक्तीने पूजा करावी

गणेशपूजा पद्धती –

१. प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे.

२. देवापुढे पानसुपारीचा विडा ठेवावा

३. देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा.

४. आसनावर बसावे.

५. हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे

६. अक्षता श्रीगणेशाच्या पायांवर वाहाव्यात.

७. उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले घेऊन मंत्रोच्चार करावा.

८. श्रीगणेशाचे स्मरण करून कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावे

९. नमस्कार करून उजवा हात मूर्ती वर ठेवावा डावा हात स्वतःच्या हृदयास स्पर्श करून श्रीगणेशाचे ध्यान करावे

१०. गणेशाच्या चरणांवर दुर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडावे

११. गणपतीच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त पाणी वाहावे

१२. ताम्हणात ४ वेळा पाणी सोडावे

१३. गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात

१४. गंध लावावे, हळद, शेंदूर, फुले,हार, कंठी, दुर्वा वाहाव्यात.

१५. प्रत्येक अवयवांवर अक्षता वाहाव्यात, विविध पत्री अर्पण कराव्यात

१६. धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे

१७. नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. विडा अर्पण करावा.

१८. विड्यावर दक्षिणा ठेवावी, समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वाहावे

१९. आरती करावी, स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी

२०. श्री गणेशास नमस्कार करावा, प्रार्थना करावी, एक पळीभर पाणी ताम्हणात सोडावे

First Published on: September 12, 2018 8:24 pm
  • Tags: गणेशोत्सव २०१८,
  • Outbrain

    Show comments