बाप्पाचं आगमन आता काही तासांवर येऊन ठेपलं आहे. महाराष्ट्राचं दैवत म्हणून ओळख असलेल्या या गणेशबाप्पाची प्रतिष्ठापना कशी करावी याबाबत आपल्यातील अनेकांना काही शंका असतात. याच शंकांचं योग्य पद्धतीने निरसन व्हावे यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने पंचांगकर्ते मोहन दाते यांच्याशी बोलून काही सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केला.

१. घरात गणपतीची प्रतिष्ठापना सुरू करायची असल्यास आणि सुरू असलेली बंद करायची असल्यास नेमके काय करावे लागते?

गणेश चतुर्थीचं व्रत हे प्रतिवार्षिक व्रत आहे. हा कुलधर्म किंवा कुलाचार नाही त्यामुळे ज्या व्यक्तीची घरात गणेशोत्सव सुरु करण्याची इच्छा असेल त्यांना गणेशोत्सव, गणपतीची प्रतिष्ठापना करता येते. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या विधीची आवश्यकता नाही. तसेच एकदा सुरु केलेले व्रत शक्यतो अखंड सुरु ठेवावे मात्र काही अडचणींमुळे ते शक्य नसल्यास बंददेखील करता येते. जसा सुरु करण्यासाठी विधी नाही तसाच तो बंद करण्यासाठी देखील विधी नाही.

२. गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का करावी ? त्याचा विधी करणं क्रमप्राप्त आहे का ?

आपण बाजारातून मूर्ती आणतो. पण जेव्हा आपण विधीवत त्याचं पूजन करून प्राणप्रतिष्ठापना करतो तेव्हाच त्यात देवत्व येतं असं मानलं जातं. आपण केवळ मूर्तीचं पूजन करीत नाही तर त्यातील देवत्वाचं पूजन करतो त्यामुळे प्राणप्रतिष्ठापना व विधीवत् पूजन करणं आवश्यकच आहे. कोणत्याही देवतेचे मंत्रांनीच आवाहन व विसर्जन होत असते.

३. प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्ती हलवू नये असं म्हणतात मग काही ठिकाणी ती हलवली जाते (लक्ष्मी आल्यावर मध्ये ठेवली जाते) असं कसं?

प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर मूर्ती हलवू नये हे बरोबर आहे. काही जणांकडे मूर्ती हलवून लक्ष्मीपाशी नेऊन ठेवण्याची प्रथा आहे, पण तसे करणे योग्य नाही. प्राणप्रतिष्ठापना झालेली मूर्ती विसर्जनापर्यंत शक्यतो हलवू नये.

४. गणपती दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, अकरा दिवस असा विविध कालावधीसाठी बसवतात? यामागचं काय कारण? सगळे एकाच कालावधीचे का नसतात?

मूळात गणेश चतुर्थीचे व्रत हे १० दिवसांचे नाही तर दीड दिवसांचेच आहे. लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले तेव्हा चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव सुरु केला. अनेकांनी आपापल्या आवडीनुसार, सोयीनुसार तीन दिवस, पाच दिवस असे पर्याय निवडले त्यामुळे त्यात विविधता दिसून येते.