News Flash

‘आजोबा’ गणपतीमुळे लोकमान्य टिळकांना मिळाली सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा!

आजोबा गणपती सोलापूरकरांचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात १८९३ साली झालेली असली तरी, त्याहीपूर्वी काही ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत असे, त्यांपैकीच एक म्हणजे सोलापुरातील आजोबा गणपती. पुण्यातील सार्वजनिक उत्सवाच्या आधी स्थापन झालेला हा गणपती सोलापूरकरांचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. सोलापूरकरांची शान असणारा हा गणेशोत्सव आज १३५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे.

या उत्सवाची नेमकी सुरुवात कशी झाली याची फारशी माहिती आज उपलब्ध नाही. पण लोकमान्य टिळक १८९२ साली सोलापूर भेटीवर आले असता, तत्कालीन आजोबा गणपती मंडळात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या ते संपर्कात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून तेथील अनेक कार्यकर्ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून संघटन आणि स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा हे सूत्र टिळकांनी नक्की केले त्यामागे सोलापूरसारख्या ठिकाणांच्या भेटीगाठी कारणीभूत होत्या हेच यातून लक्षात येते.

सोलापुरातील हे मंडळ त्या काळी केवळ गणेशोत्सवापुरतेच मर्यादित नव्हते. ज्या शुक्रवार पेठेत आजोबा गणपतीचे स्थान होते तेथील अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती. किंबहुना त्यामुळेच या पेठेला स्वातंत्र्य सैनिकांची पेठ असेदेखील म्हटले जायचे. आजोबा गणपती मंडळाचे वैशिष्टय़ म्हणजे गणपतीची मूर्ती दर वर्षी विसर्जित केली जात नाही. १८८५ साली कागदाचा लगदा, कापडाचे तुकडे, बांबू, कामटय़ा, गव्हाचे तणस, चिंचोका खळ आणि सुतळ्या इ. साधनांपासून ही मूर्ती तयार करण्यात आली होती. याच मूर्तीचे कित्येक वर्षे पूजन होत असे. तर १९९५ च्या सुमारास ही पूर्वीची मूर्ती जाऊन त्या जागी नवीन मूर्ती तयार करण्यात आली.

सोलापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आजोबा गणपतीला प्रमुख मान असतो. प्रारंभीच्या काळात आजोबा गणपती म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक समजला जात होता. ही परंपरा स्वातंत्र्योत्तर काळात लोप पावली. माणिक चौकातील प्रसिद्ध सूफी संत मगरीबशाह बाबा हे मोठ्या श्रद्धेने आजोबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत गणपतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सश्रद्ध भावनेने दर्शन घेत असत. एवढेच नव्हे तर मिरवणुकीत गणपतीपुढे बाबांचा हिरवा ध्वजही असे. १९६७ च्या काळात सोलापूरात जातीय दंगल झाली. त्यानंतर ही परंपरा खंडीत झाली. सध्याचे राजकीय धुर्वीकरण आणि लोकांची मानसिकता पाहता ही परंपरा सुरू होण्याची कल्पनाच करवत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 12:13 pm

Web Title: ganapati utsav 2019 solapur ajoba ganpati lokmanya tilak nck 90
Next Stories
1 Ganapati Utsav 2019 : असे करा ड्रायफ्रूट मोदक
2 पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास माहितीये का?
3 Ganapati Utsav 2019 : घरच्या घरी तयार करा चॉकलेटचे मोदक
Just Now!
X