पुण्यात तब्बल सव्वा महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्री जोरदार हजेरी लावली अन् दररोज सायंकाळी-रात्री आपला रतीब कायम ठेवला. गणपतीच्या गेल्या पाच दिवसांत पावसाने ११० मिलिमीटरचा आकडा ओलांडला असून, पुढील दोन-तीन दिवसही दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे गर्दी अपेक्षित असलेल्या दिवसांत उत्सवावर पावसाची छाया असण्याची शक्यता आहे.
शहरात पावसाने जून-जुलै या महिन्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यात तर ३१ पैकी २८ दिवस पाऊस पडला. त्यानंतर मात्र, संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने अगदीच तुरळक हजेरी लावली. त्यानंतर बरोबर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दररोज सायंकाळच्या वेळी न चुकता पाऊस पडला आहे. मंगळवारी रात्री त्याचा जोर इतका प्रचंड होता की, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची नोंद ५६.५ मिलिमीटर इतकी झाली. या पाच-सहा दिवसांमध्ये पुणे वेधशाळेत ११२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आता गौरीविसर्जन झाल्यानंतर शनिवारी-रविवारी गणपती पाहायला पुण्यात गर्दी अपेक्षित आहे. पण या काळात सायंकाळी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
याबाबत पुणे वेधशाळेतील अधिकारी सतीश गांवकर यांनी सांगितले की, सध्या स्थानिक घटनांचा परिणाम म्हणून पाऊस पडत आहे. दुपापर्यंत उष्मा आणि त्यानंतर पावसाच्या सरी हेच वातावरण सोमवापर्यंत कायम राहणार आहे. त्यानंतरची स्थिती काय राहील हे पुढील दोन दिवसांत समजेल.
गेल्या सहा दिवसांत पुण्यात नोंद झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)-
८ ते ९ सप्टेंबर-            १०.३
९ ते १० सप्टेंबर-        २०.२
१० ते ११ सप्टेंबर-        ५६.५
११ ते १२ सप्टेंबर-        ९.८
१२ ते १३ सप्टेंबर-        ०.३
१३ सप्टेंबर (सायंकाळपर्यंत)- १५.१