गणेश विसर्जन मिरवणुकीतील आकर्षक सजावटी.. कुठे आकर्षक फुलांची आरास, तर कुठे रंगीबेरंगी विद्युत दिव्यांचा झगमगाट.. एकीकडे ढोल-ताशांचा दणदणाट, तर दुसरीकडे ‘डीजे’चा ठणठणाट.. कुणाच्या कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध वाटचाल, तर कुणाची ‘झिंगलेली वाट’.. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अशा चांगल्या-वाईट गोष्टी दिसतात. चांगल्या गोष्टींना प्राधान्य देत अनेक मंडळे उत्सवाची ही वैभवशाली परंपरा नेटाने चालवित आहेत. पण, या मिरवणुकीतील एक घटक नेहमी दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे गर्दीतील सामान्य नागरिक..! यंदाही त्याचीच अनुभूती आली. गर्दीतील धक्काबुक्की, कुचंबणा, हेळसांड, तर कधी पोलिसांची लाठी.. हे त्याच्यासाठी नेहमीचेच, तरीही तो या वैभवशाली उत्सवाचा वर्षांनुवर्षे भाग होतो आहे.
पुणे शहराची दिवसेंदिवस प्रगती झाली. रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते कमी पडू लागले. त्यामुळे कुठे एकेरी वाहतूक, तर कुठे ‘नो पार्किंग’ आले. रस्तोरस्ती सिग्नलचे लाल, हिरवे, पिवळे दिवे मिचमिचू लागले. त्यातून वाहतूक सुरळीत झाल्यास यंत्रणा स्वत:ची पाठ थोपटून घेत असते. पण, ही सर्व उपाययोजना रस्त्यावर केवळ वाहनेच धावतात, हेच लक्षात घेऊन केलेली असते. रस्त्यावरून माणसेही चालतात, याकडे दुर्लक्ष केले जाते व त्यातूनच पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होते. अशीच काहीशी स्थिती गणेश विसर्जन मिरवणुकीत दिसून येते. मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकाला मिरवणुकीच्या नियोजनात गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसते.
विसर्जन मिरवणूक सुरू असताना मुख्य मार्ग असलेल्या लक्ष्मी रस्ता, टिळक चौक, बेलबाग चौक या भागांमध्ये गर्दीतील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांचे अनेक प्रश्न व अडचणी समोर आल्या. इतर उत्सवातील गर्दीमध्ये असणारे हौसे, नवसे, गवसे यांच्याबरोबरच गर्दीची संधी साधून वेगवेगळे ‘हेतू’ पूर्ण करणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी मनोभावे गणेशाची भक्ती करणारे किंवा पुण्यातील भव्य मिरवणूक पाहण्यासाठी बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते. यंदा मिरवणुकीच्या दरम्यान पाऊस नसल्याने मानाच्या गणपतींच्या विसर्जनापासूनच मोठी गर्दी झाली होती. विद्युत रोषणाईचे देखावे मिरवणुकीत आल्यानंतर या गर्दीमध्ये आणखी भरच पडली.
लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौकापासून टिळक चौकाकडे येण्यास नागरिकांना एकेरी मार्ग जाहीर करण्यात आला होता. ही माहिती अनेकांना नव्हती, त्याचप्रमाणे कुठे तसे फलकही नव्हते. त्यामुळे दोन्ही बाजूने नागरिक लक्ष्मी रस्त्यावर येत होते (हे दरवर्षीच घडते). रस्त्याच्या पदपथावरील जागा हीच केवळ नागरिकांना चालण्यासाठीचा मार्ग असतो. लक्ष्मी रस्त्यावरील पदपथ रोजच्या गर्दीलाही अपुरा पडतो, मग विसर्जन मिरवणुकीच्या वेळी तेथील दृष्य कसे असू शकेल, हे केवळ मिरवणुकीच्या वेळी तेथून गेलेला नागरिकच सांगू शकतो. ‘‘आपण नुसते थांबायचे, गर्दी आपोआपच पुढे घेऊन जाते,’’ असे एकजण म्हणाला. अक्षरश: श्वास घ्यायलाही जागा न मिळावी, अशी परिस्थिती काही वेळेला निर्माण होते. मध्येच एखादी फट दिसल्यास तेथून बाहेर पडावे म्हटले, तर पोलिसांची लाठी खावी लागते. त्यामुळे गर्दीत शिरायलाच नको, अशी भूमिकाही काहींनी मांडली. पदपथावरून न चालता चौकात थांबले तरी एखाद्या गणेशाची मिरवणूक आल्यास धक्काबुक्कीचा अनुभव घ्यावा लागतो. नेमके थांबायचे कुठे अन् जायचे कुठे हेच कळत नसल्याने अनेकांचा गोंधळ उडतो. गर्दीतील या सर्व परिस्थितीचा अनुभव पुरुष मंडळी एकवेळ सहन करू शकतात, पण लहान मुले व विशेषत: महिलांची त्यात मोठी कुचंबणा होत असल्याने त्यांनी मिरवणूक पाहण्यास येऊच नये का, असा प्रश्न भोर येथून आलेल्या एका महिलेने केला.
विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी ढोल पथके, कार्यकर्ते.. डीजेच्या तालावर अचकट-विचकट चाळे करून किंवा मद्यधुंद होऊन नाचणारी मंडळी, यांना विसर्जन मार्गावर सुरक्षितपणे वाटचाल करता येते. पण, गर्दीतील सामान्य माणसाचा मार्ग मात्र नेहमी काटेरीच असतो. भारावलेपण घेऊन तो उत्सवात येतो, पण अनेकदा वाईट अनुभव घेऊनच त्याला परतावे लागते. ‘पाहणारा नसेल, तर सजण्याला अर्थ नाही’, या उक्तीप्रमाणे ज्यांच्यासाठी विसर्जनाचा दिमाख उभारला जातो, त्या नागरिकांना समाधानाने गणेशाचे वैभव पाहण्यासाठी नियोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.