अनंत चतुर्दशीच्या दिवशी विघ्नहर्त्यां गणरायाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने सोमवारी समुद्र किनारे, तलाव आणि कृत्रिम तलावांवर होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, पालिकेच्या अनास्थेमुळे खड्डय़ांतूनच आगमन झालेल्या गणरायाला खड्डय़ांच्या मार्गातूनच विसर्जनस्थळी जावे लागणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्याच्या तयारीत शनिवारी सायंकाळपासून भाविक व्यग्र होते, तर विसर्जन सोहळ्यास कोणतेही गालबोट लागू नये याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत होती. मुंबईत ४७ हजार पोलिसांचा कडा पाहारा ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाच्या १०, तर सीमा सुरक्षा दलाच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, एनएसएसचे स्वयंसेवक, छात्रसैनिक अशा सुमारे १०,५०० जणांची फौज विसर्जनस्थळांवर कार्यरत असणार आहे. या कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी समाजकंटकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार अंमली पदार्थाचे व्यसन करणाऱ्या ६९०, तर अंमली पदार्थ बाळगणाऱ्या पाच जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.