गणेशोत्सवात पर्यावरणाचा गाजावाजा सर्वच जण करतात, पण त्यातील किती लोक पर्यावरणाचे भान ठेवतात हे एक न उलगडणारे कोडे आहे. मात्र, शिवाजीनगरातील चिमुकल्यांनी प्रत्यक्ष कृतीतून ते करून दाखवले. गेल्या दोन वर्षांपासून ही मुले स्वत:च्या हाताने मातीची गणेश मूर्ती बनवून स्थापित करीत आहेत.
शिवाजीनगर नागरिक मंडळ गेल्या ४८ वषार्ंपासून गणेशोत्सव साजरा करीत आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला, तो उद्देश खऱ्या अर्थाने येथे साध्य होत आहे. शुद्ध मातीपासून बनविलेली गणेश मूर्ती स्थापित करणाऱ्या या मंडळाला दोन वर्षांपूर्वी मूर्तीकारानेच ठकविले. शुद्ध मातीचीच मूर्ती असल्याचे सांगून प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती या मंडळाच्या हातात थोपवली.
 ४६ वषार्ंच्या त्यांच्या परंपरेला एका मूर्तीकाराने खंडित केले. विसर्जनाच्यावेळी ही मूर्ती पाण्यावर तरंगत असल्याचे पाहून मंडळाचे सर्वच पदाधिकारी दुखावले. त्याचक्षणी त्यांनी स्वत: मूर्ती तयार करण्याचे निश्चित केले. मंडळातील किशोरवयीन कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी त्यांच्या अंगावर घेतली. मूर्तीकलेचा अनुभव नसल्यामुळे पहिल्या वर्षीचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. मूर्ती सुस्वरूप आली नाही, पण मातीच्या मूर्तीचे समाधान त्यांना मिळाले. टेकडीचा गणपती त्यांनी साकारला. यावर्षी मात्र त्यांनी सिस्फाच्या मातीकला विभागाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी रात्रंदिवस शाळा, महाविद्यालय आणि अभ्यास याचा समन्वय साधत मूर्ती तयार करतात. परिसरातील नोकरदार वर्गसुद्धा त्यांचे कार्यालयीन कामकाज आटोपून त्यांना या कामात मदत करीत आहेत.
यावर्षी ही मुले आदास्याचा पाच फूट उंचीचा गणपती साकारत आहेत. दरवर्षी विदर्भातील अष्टविनायकापैकी एक येथे साकारण्याचा त्यांचा मानस आहे. या मूर्तीकलेमुळे परिसरातील नागरिक एकमेकांना अधिक चांगल्यापद्धतीने जोडले गेले आहेत. पर्यावरण रक्षणाबरोबरच लोकमान्य टिळकांचा लोकांना एकत्रित आणण्याचा उद्देशदेखील या ठिकाणी साध्य होत आहे.
शिवाजीनगरात विविध जातीधर्मांचे लोक राहतात. एकाअर्थी हा ‘कॉस्मोपोलिटन’ परिसर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे गणेशेात्सवाच्या दहाही दिवस वेगवेगळया धर्माच्यापद्धतीने गणेशमूर्तीची पूजा केली जाते. युवकांना प्रेरणा मिळेल, अशा विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात.
गणेशेात्सवाच्या एक महिन्या आधाीपासूनच युवकांना गणेशोत्सवाची झिंग चढते. गणेशोत्सवात सल्ले अनेकजण देतात, पण अंमलबजावणी करताना निरुत्साह असतो. या तरुण पिढीने मात्र गणेशोत्सवाचे सर्व उद्देश साध्य केले आहेत.