पनवेल शहरातील टपाल नाका येथील श्री गणेश मित्र मंडळाचा इको फ्रेंडली बाप्पा सध्या पनवेलच्या गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. जासईचे मोरेश्वर पवार यांनी श्रींच्या या मूर्तीला प्रत्यक्षात साकारले आहे. हा इको बाप्पा सध्या पनवेलच्या गणेशभक्तांना आजीआजोबांचे समाज व घरातील महत्त्व पटवून देणारा ठरत आहे.
पनवेल गावातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ५२ वर्षांपूर्वी टपालनाक्यावर याच श्री गणेश मित्र मंडळाने रोवली. यंदा इको फ्रेंडली बाप्पासोबत आजी-आजोबा हवेत असा संदेश देणारा माहितीपट येथे चलत्चित्रातून साकरला जात आहे.
यामुळेच सलग सार्वजनिक गणेशोत्सवांच्या विविध स्पर्धात मंडळांच्या मानात पुरस्कारांचे मानकरी हे मंडळ ठरल्याची माहिती या मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र खळदे यांनी दिली. कलाकार मोरेश्वर पवार यांनी ही श्रींची मूर्ती साकारताना उंचीचे भान ठेवत सात फूट गणेशाची मूर्ती तयार केली. मात्र या मूर्तीचे वजन अवघे १० किलो आहे. येथील चलत्चित्रांमुळे आणि माहितीपटामुळे हा गणेशोत्सव बच्चेकंपनीला आपला वाटू लागला आहे. आजी-आजोबांचे घरातले आणि समाजातले
स्थान सांगणारा हा माहितीपट येथे संवाद व चलत्चित्रातून मांडण्याचे काम मंडळाने केले आहे. या माहितीपटासाठी पेंटिंग रमेश डुकरे, चलतत्चित्र जगदीश भोईर, संकल्पना आणि लेखन प्रथमेश सोमण, लहानग्या मुलांचे आवाज शेजल जोशी आणि अथर्व गोखले यांचे आहेत. या मंडळाचे मार्गदर्शक चंद्रशेखर सोमण हे आहेत.
येथील बाप्पांसोबत आजीआजोबांची गोष्ट ऐकण्यासाठी येथे गणेशोत्सवाच्या चार दिवसांपर्यंत तीन हजार गणेशभक्तांनी येथे आपली हजेरी लावली आहे. टपाल नाका परिसराची कष्टकऱ्यांची ओळख सांगणारा हा गणेशोत्सव सार्वजनिक विवेकाचे प्रतीक ठरला आहे.