गणरायाची मूर्ती घरी आणताना भक्त मोठय़ा श्रद्धेने त्यांना डोक्यावरून आणत. या वेळी सोबत असलेल्या भजन मंडळींच्या टाळ-मृदुंगांच्या नादमय वातावरणाने सर्व वातावरण भारावलेले असत. बदलत्या काळात या प्रथाही बदलत आहेत. तरुणाईच्या नव्या ढंगामुळे सध्या गणपतीचे चारचाकी वाहनातून व डीजेच्या तालावर आगमन होत आहे. यामुळे गणेशोत्सवातील चैतन्यमय वातावरणच सध्या हरपू लागले आहे. त्यामुळे गणेशोत्सवालाही सध्या इव्हेंटचेच स्वरूप येऊ लागले आहे.
उत्साह आणि आनंद देणारा सण म्हणजे गणेशोत्सव. या सणाची तयारी महिना-दोन महिने आधीपासूनच सुरू केली जाते, मात्र सध्याच्या धकाधकीच्या तसेच आधुनिकतेच्या जीवनात गणेशोत्सवाचे स्वरूपही दिवसेंदिवस बदलू लागले आहे. यापूर्वी घरच्या घरी कागद, कापड, फुले आणि नैसर्गिक रंग आदींचा वापर करून सजावट करण्यात येत. यात काळानुरूप बदल होत गेला आहे. आता रंगीत कागदांची जागा थर्माकॉलने घेतली आहे. सध्याच्या धावपळीत सजावटीसाठी सध्या रेडीमेड मखरांनाच पसंती दिली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीतील तरुणांची कल्पना व त्यातून साकार होणारी सजावट कमी झालेली दिसते.
मागील पन्नास वर्षांत गणेशोत्सव साजरा करण्याच्या प्रथा आणि परंपरेतही बदल घडले आहेत. कुटुंबांतील गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव तसेच परंपरेने आलेला सण म्हणून साजरा केला जात होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र येत होते.घरातील ज्येष्ठ भावाला पहिला मान दिला जात होता. कुटुंबविभक्त झाले तरी सर्व भाऊ एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करीत होते. मात्र सध्याच्या मालमत्तामुळे निर्माण होणारे हेवेदावे व वाढत्या मतभेदांमुळे तसे होताना दिसत नाही. दोन भावांच्या भांडणामुळे आता गणपतीही वेगळे झालेले आहेत. या उत्सवामागील भावना सध्याच्या पिढीला सांगण्याची गरज असून निखळ भक्ती आणि शक्तीचा संगम असलेला हा गणेशोत्सव व त्यातील मजा घेताना गणेशोत्सावातील नियम पाळण्याची जबाबदारी तरुणांनी घेतली पाहिजे तरच बदलत्या युगातही गणेशोत्सवाचे महत्त्व अबाधित राहू शकेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.