सात दिवस भक्तांकडे पाहुणचार घेऊन घरी निघालेल्या लाडक्या गणपतीला निरोप द्यायला मुंबईच्या विसर्जन तलाव आणि किनाऱ्यांवर भक्तांची गर्दी उसळली होती. संध्याकाळी पावसाच्या रिमझिम सरींमध्ये श्रीगणेशाला आणि गौरींनाही निरोप देण्यात आला. आतापर्यंत दीड दिवस, पाच दिवस व सातव्या दिवशी साधारणपणे एक लाख मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आह़े
गणेशाला निरोप देण्यासाठी मार्वे, जुहू, दादर, गिरगाव चौपाटींवर गर्दी झाली होती. पालिकेने तयार ठेवलेल्या कृत्रीम तलावांनाही चांगला प्रतिसाद होता. श्रीगणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप दिला जात होता. गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ३८ हजार ९९ घरगुती मूर्तींचे, ३९७ सार्वजनिक मूर्तीचे तर ३ हजार ९३४ गौरींचे विसर्जन करण्यात आले. यातील ३ हजार ३१० घरगुती, २६ सार्वजनिक आणि २८९ गौरी कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या.
पाचव्या दिवशी २८,३५६ घरगुती तर १,२५२ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले होते. त्याआधी दीड दिवसावेळी ४७,७३४ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईत साधारण दोन लाख घरगुती तर १२ हजार सार्वजनिक गणपतींचे पूजन होते.