शंकर-पार्वतीकडून चिरंजीव गणेशाला शाबासकीच्या रूपात मिळाललेला मोदकही यावर्षी महागला आहे. एरवी घरोघरी केले जाणारे वेगवेगळ्या खाद्य पदार्थापासून तयार केलेल्या मोदकांची विक्री बाजारात मोठय़ा प्रमाणात होत आहे. गणेशोत्सवाच्यानिमित्ताने महिला गटाला चांगला रोजगार मिळाला. आधीच सर्व जीवनावश्यक वस्तू महाग असल्याने मोदकही महाग झाला आहे.
सर्वत्र काटकसर करीत गणेशाचे स्वागत करायचे म्हटले तरी मोदकाला पर्याय नाही. ओल्या नारळाचे तळलेले मोदक २०० ते २५० रुपये किलोने मिळत आहेत. हापूस आंब्याचे मोदक ६० रुपयांना २१ नग आहेत, खव्यापासून बनवण्यात आलेले मोदक ३४० रुपये किलो आहेत, केसर मोदक ३६० रुपये किलो तर काजू मोदक चक्क ६५० रुपये किलो आहेत. या शिवाय पेढेपासून तयार करण्यात आलेले मोदक ३५० रुपये किलोप्रमाणे विक्रीला आहेत. पूर्वी उकडीचे मोदक घरी केले जात असे आता मात्र तेही बाजारात विक्रीसाठी आले आहे. दहा दिवस गणेशाची सकाळ संध्याकाळ आरती प्रसादाशिवाय व्यर्थ आहे. त्यावेळी केवळ मोदकाचाच प्रसाद असतो असे नव्हे तर रवा भाजून त्यात खोबरे किस, विविध फळांच्या एकत्र केलेल्या फोडी, भिजलेली हरबरा डाळ आणि साखर इत्यादी प्रसादांचे पर्यायही उपलब्ध असतात. मोदकांबरोबरच या वस्तूही महागल्याने प्रत्येक ठिकाणी खर्चाला कात्री लावली जात असली तरी खाण्याच्या वस्तूंमध्ये खास करून मोदकांमध्ये पैसे वाचवण्याचा प्रश्नच नाही. एकवेळ सजावटीच्या वस्तूंसाठी हात आखडता करता येईल, मात्र प्रसाद कितीही महागडा झाला तरी मोदकाच्या प्रसादाला दुसरा पर्याय नसल्याने मोदक कितीही महाग असोत त्यांची मागणी आजही तेवढीच आहे.
सजावटीच्या वस्तूंपेक्षा गणपतीचे पावित्र्य राखण्यास कार्यकर्त्यांचा कल दिसून येत असून सजावटीला दुय्यम स्थान दिले जात आहे. गणेशजी जरी नव्याने दरवर्षी येणार असले तरी त्यांच्यासाठी पूर्वीचाच साज-श्रुंगार  उपयोग आणण्यावर भर दिला जात आहे. शक्य तेथून पैसे वाचवण्याचा गणेश भक्त प्रयत्न करीत आहेत. सजावट, आकर्षक मखर, लायटिंग, कृत्रिम प्लॉवर डेकोरेशनसाठी गेल्यावर्षीची किंवा त्यापूर्वी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंना पुन्हा एकदा गणेशाच्या तैनातीत उभारले जाणार आहे. शक्य त्या ठिकाणी थर्माकोल, साडी किंवा जाळीच्या ओढणीची झालर, सोन्या-चांदीपेक्षा मोत्यांच्या किंवा मण्यांच्या माळा, तोरणे आणि ठेवणीतले झुंबर स्वच्छ करून नव्याने त्यांची आकर्षक मांडणी करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. याशिवाय मोत्यांची गेल्यावर्षीचीच आभूषणे स्वच्छ केल्याने नव्यासारखीच ती चमकू लागली आहेत. सोन्याचांदीची गगनाला भिडलेले भाव पाहता कंबरपट्टे, बाजूबंद, अंगठी, स्टोन मुकूट, गळ्यातल्या माळा या मोत्यांच्याच घेण्याचा नागरिकांचा कल दिसून येत आहे.