गणपतीच्या स्वागतासाठी औरंगाबाद शहर सज्ज झाले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिवसभर कमालीचा उत्साह होता. बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वतयारीत सारेच गुंतले होते. गणेश चतुर्थीपासून पुढील दहा दिवस कार्यक्रमांची रेलचेल असल्याने पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.
शहरात सर्वत्र गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. पूजा साहित्य व आकर्षक मूर्तीमुळे बाप्पांच्या आगमनाचा उत्साह वाढला. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यामुळे त्यात भर पडली. मराठवाडय़ात यंदा दुष्काळाचे संकट असल्याने किमान गणेशोत्सवादरम्यान चांगला पाऊस येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. बाप्पा पाऊस घेऊन येईल, अशी याचनाही केली जात आहे.
गणेशोत्सवदरम्यान विविध कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत. शहरातील मानाच्या संस्थान गणपती मंडळाच्या वतीने अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन केले आहे. उत्सवादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नयेत, म्हणून चोख पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. उत्सवाच्या कालावधीत ध्वनिप्रदूषणावर बंधने घातली जाणार आहेत. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मात्र ढोल-ताशे वाजविणाऱ्यांचे एकत्रीकरण केले आहे. काही दिवसांपासून त्यांचा सरावही सुरू होता. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत.
शहरातील गणेश महासंघाच्या गणेशाची प्रतिष्ठापना सकाळी ११ वाजता होणार आहे. खासदार चंद्रकांत खैरे, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आदींची उपस्थिती असणार आहे. सकाळी १० वाजता समर्थनगर येथे विवेकानंद महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे.