रायगड जिल्ह्य़ात ५४ हजार गौरी-गणपतींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशाच्या गजरात वाजतगाजत गौरी-गणपतींना निरोप देण्यात आला. या वेळी ठिकठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
कोकणात गौरी-गणपतीच्या सणाचा गुरुवारी समारोप झाला. पाच दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. जिल्ह्य़ात ८६ सार्वजनिक तर ५३ हजार ९५५ घरगुती गणपतींचे तर १ हजार ३७५ गौरींचे विसर्जन करण्यात आले. अलिबाग, उरण, मांडवा, आक्षी, मुरूड, श्रीवर्धन आणि रेवदंडा येथील समुद्रकिनाऱ्यावर गणेशविसर्जन करण्यात आले. तर इतर ठिकाणी नदी आणि तलावांमध्ये गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. माणगाव तालुक्यात सर्वाधिक ५ हजार ४५१ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
उत्तर रायगडातील रोहा, माणगाव, रोहा, श्रीवर्धन आणि म्हसळा पोलादपूर परिसरात गणेशविसर्जन मिरवणुकीत पारंपरिक सनई आणि खालुबाजाचा वापर करण्यात आला. विसर्जन मिरवणुकांच्या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संध्याकाळी चार वाजल्यापासून गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. ठिकठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी सामुदायिक आरत्यांचेही पठन करण्यात आले. या वेळी सजवून आणलेल्या गौरींचेही विसर्जन करण्यात आले.
विसर्जनाच्या नंतर होणारी गणेशमूर्त्ीची विटंबना आणि प्रदूषण टाळण्यासाठी अलिबाग नगर परिषदेने गणपती विसर्जनासाठी समुद्रकिनाऱ्यावर कृत्रिम तलावाची व्यवस्था केली होती. या कृत्रिम तलावात गणेशविसर्जन करण्याचे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात येत होते. या तलावात मूर्तीचे विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांना गांडूळ खताचे वितरण करण्यात येत होते. निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. अलिबागकरांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या वेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी भाविकांना दिला.
दरम्यान कोकणातील गौरी-गणपतींच्या उत्सवाचा गुरुवारी समारोप झाल्याने चाकरमानी आज सकाळपासून परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.