गणेशोत्सवाला दोन दिवस शिल्लक असताना बाजारात मोठय़ा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींच्या मूर्ती विदर्भातील विविध जिल्ह्य़ात विक्रीसाठी आल्या आहेत. या मूर्तींची नियमाला डावलून खुलेआम विक्री होत आहे. महापालिकेने आदेश दिल्यानंतरही प्रशासनातील अधिकारी आणि नियुक्त केलेल्या समितीकडून त्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक असून नागरिकांनी त्या मूर्ती ऐवजी मातीच्या किंवा शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आल्यानंतरही मोठय़ा प्रमाणात त्या मूर्तींची खरेदी होत असते आणि महापालिकेचे त्यावर कुठलेही नियंत्रण नसते. दोन वर्षांआधी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणण्याचा ठराव सभागृहात करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर काही मूर्तीकार न्यायालयात गेले असताना न्यायालयाने काही अटी व शर्ती ठेवत बंदी उठविण्याचे आदेश दिल्यानंतर मोठय़ा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री झाली. यावेळी सुद्धा बाजारात विविध भागातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. ज्या मूर्तीकारांकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहेत. त्या मूर्तींच्या मागे लाल रंगाचे चिन्ह असावे, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहे. मात्र, त्या नियमाचे पालन अनेक मूर्तीकार करीत नाही. शहरात मानेवाडा, हुडकेश्वर, जागनाथ बुधवारी, नंदनवन, जयताळा, सक्करदरा, महाल, सदर, पाचपावली, बडकस चौक आणि चितार ओळ परिसरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे स्टॉल्स मोठय़ा संख्येने लावण्यात आले आहे. शाडू मातीच्या नावावर त्यांची विक्री केली जात आहे. अशा मूर्ती शोधण्यासाठी महापालिकेने मूर्तीकार आणि प्रशासनातील काही कर्मचारी अशी १३ लोकांची समिती तयार केली असून त्यांना अशा मूर्ती जप्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, या समितीने अजूनपर्यंत एकही मूर्ती जप्त केली नसल्याची माहिती मिळाली. जलाशयातील पाणी दूषित होऊ नये म्हणून विसर्जनासाठी महापालिकेने सर्व तलावांजवळ आणि विविध वस्त्यांमध्ये कृत्रिम तलावाची व्यवस्था करीत असतात.  

यासंदर्भात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर यांनी सांगितले, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची तपासणी करण्यासाठी समिती तयार करण्यात आली असून त्याचा अहवाल अजूनपर्यंत आला नाही. यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसाठी तलावाच्या ठिकाणी आणि शहरातील विविध प्रभागांमध्ये कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने पीओपीच्या मूर्ती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी तलावांबाहेर काढल्या जातात. त्यामुळे या मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे त्या विकत घेऊ नका, असे आवाहन काही पर्यावरण आणि सामाजिक संघटनांनी केले आहे. परंतु, त्याला जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी आणणे शक्य नाही. पीओपी मूर्तीवर सांकेतिक रंग लावणे आणि दुकानात फलक लावणे आवश्यक असल्याचे गणवीर म्हणाले.

संती सार्वजनिक गणशोत्सव मंडळात यावर्षी नाशिकच्या सप्तश्रृंगी देवी मंदिराची प्रतिकृतीप्रतिनिधी, नागपूर<br />आझाद क्रीडा मंडळ संचालित संती सार्वजनिक गणशोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून यावर्षी नाशिकच्या सप्तश्रृंगी देवी मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे संयोजक संजय चिंचोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंडळातर्फे वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दारोडकर चौकाजवळ असलेल्या या गणेशोत्सव मंडळात सप्तश्रृंगी देवी मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात येत असून गेल्या एक महिन्यापासून त्यासाठी प्रारंभ करण्यात आला आहे. या सप्तश्रृंगी देवीसोबतच म्हैशासुराचे शिर, दक्षिणमुखी गणपती मंदिर, दत्त मंदिर, रामलक्ष्मण सीता व हनुमान मंदिर राहणार आहे.  सप्तश्रृंगी मंदिर पहाडामध्ये असल्यामुळे त्याची प्रतिकृती तयार केली जात आहे. सायंकाळी रोज आरतीच्या आधी स्थाानिक कलावंत देवीचा गोंधळ सादर करणार आहे. संस्कृतीची जपणूक करणारे मंडळ म्हणून संती गणेश उत्सव मंडळाचे नाव घेतले जाते. येणाऱ्या भाविकांचे स्वागत टिळा लावून करण्यात येणार आहे. मंदिराच्या बाहेर ओटीचे सामान मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. साक्षात सप्तश्रृंगी मंदिराचा भास व्हावा, अशा पद्धतीने वातावरण राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाचे दोनशेपेक्षा अधिक कार्यकर्ते विविध व्यवस्थेमध्ये राहणार आहे. शिवाय सीसी टीव्ही आणि मेटल डिटेक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.
 गेल्यावर्षी ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी दर्शन घेतले होते. मंडळाने यापूर्वी शेगावचे संत गजानन मंदिर, पंढरपूर विठ्ठल रुख्मिनी मंदिर, मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त १८५७ च्या संग्रामावर आधारित ‘जंग आझादी की’चा देखावा, शिर्डीचे साईबाब मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर, तुळजापूर देवी मंदिराची प्रतिकृती आतापर्यंत तयार करण्यात आल्या. पोलीस आयुक्तातर्फे आदर्श गणेश मंडळाचा पुरस्कार यावेळी मंडळाला मिळाला आहे. पत्रकार परिषदेला राजेश श्रीमानकर, राजेश घोडपागे, अलाहाबाद बँकेचे मुरली कृष्णा, सुनील साऊरकर उपस्थित होते.