गणेशोत्सवाच्या काळात महाप्रसादाचे आयोजन करत भक्तांना तृप्त करण्याचे बेत आखणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यंदा अन्न व औषध प्रशासनाकडून त्यासाठी विशेष परवाना घ्यावा लागणार आहे.  यंदाच्या वर्षी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. त्यामुळे गणेशोत्सव आयोजकांची मात्र तारांबळ उडण्याची शक्यता आहे. हे परवाने कोठून मिळवायचे, यासंबधी कोणतीही ठोस माहिती मंडळांपर्यंत पोहोचली नसल्याचे दिसून येत आहे.         
गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणावर प्रसादाचे तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसादाच्या माध्यमातून दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भक्तांच्या जेवणाची व्यवस्था ठेवली जाते. या जेवणातून किंवा प्रसादातून विषबाधा झाल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केला आहे. एका वर्षांसाठी शंभर रुपयांचे शुल्क भरून सार्वजनिक मंडळांना नोंदणी अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर करता येणार असून त्यासाठी मंडळाचे नाव, मंडळाच्या अध्यक्षांचा फोटो आणि अन्य माहिती भरून नोंदणी करावी लागते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंडळाचा परवाना घेऊन त्यानंतर मंडळाला महाप्रसादाचे आयोजन करता येऊ शकते.
* महाप्रसाद तयार करताना लागणारा कच्चा माल तसेच अन्नपदार्थ हे नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावे लागणार आहेत.
* महाप्रसादाचे जिन्नस तयार करताना त्यासाठी खरेदी केलेल्या कच्च्या मालाचे खरेदी बिल, प्रसाद बनविणाऱ्या कंत्राटदाराची संपूर्ण माहिती तसेच जेवण वाढणाऱ्या वाढपी किंवा स्वयंसेवकांची इत्थंभूत माहिती मंडळांना लिखित स्वरूपात ठेवावी लागणार आहे.
* हे नियम मोडणाऱ्या मंडळांना तब्बल एक लाख रुपयांचा दंड केला जाऊ शकतो.
अप्रिय घटना टाळण्यासाठी अंमलबजावणी आवश्यक
या परवान्यामुळे स्वच्छतेचे सर्व निकष पाळून प्रसादाचे उत्पादन मंडळांना करावे लागणार आहे. उत्सव काळात दुग्धजन्य पदार्थाचा, माव्याचा वापर आणि मागणी वाढत असते. त्यामध्ये अनेक वेळा भेसळ किंवा शिळ्या पदार्थाचा वापर होण्याची शक्यता असते. मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना याविषयी ठोस माहिती नसल्यास अप्रिय घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळेच ही प्रतिबंधक उपाय योजत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कोकण परिक्षेत्राच्या ठाणे मंडळाचे सहआयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले.
निर्णयाचे स्वागतच..पण कळणार कधी?
महाप्रसादाचे आयोजन करताना परवाने काढावेत या निर्णयाचे स्वागत असले तरी त्यासंबंधी अनेक मंडळापर्यत माहिती उपलब्ध नाही, अशी प्रतिक्रिया कल्याण येथील सुभेदारवाडा गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त भालचंद्र जोशी यांनी दिली. अनेक गणेशोत्सव मंडळांमार्फत सर्व कायद्यांचे पालन करून उत्सव साजरा केला जातो. प्रसादासंबंधीचा निर्णय स्वागतार्ह असला तरी तो कसा पाळायचा याची माहिती मात्र मंडळांपर्यत पोहोचलेलीच नाही, असेही त्यांनी सांगितले. महाप्रसादासाठी आवश्यक असलेला परवाना कोठून मिळवायचा तसेच त्यासाठी आवश्यक शुल्क कोठे भरायचे, याची माहिती मंडळांपर्यंत पोहोचायला हवी, अशी मागणी वाशी सेक्टर २ सी टाइप गणेशोत्सव मंडळाचे सल्लागार पीयूष पटेल यांनी दिली.  असा काही नियम आहे याची आम्हाला माहितीच नाही, अशी कबुलीही पटेल यांनी दिली.