आपल्या गल्लीचा, विभागाचा किंवा मंडळाचा गणपती इतर मंडळांच्या गणपतींपेक्षा जास्त उठून दिसावा, आपला उत्सव इतरांपेक्षा जास्त झगमगीत असावा, या प्रयत्नात असलेल्या मुंबई शहर विभागातील सर्वच गणेशोत्सव मंडळांना बेस्ट प्रशासनाने वीजेसाठी अधिकृत तात्पुरती जोडणी घेण्याचा सल्ला दिला आहे. प्रशासनाने तात्पुरती जोडणी मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुलभ केली असून आता एका दिवसात सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मांडवात झगमगाट होऊ शकणार आहे. तसेच वीजचोर मंडळांवर कारवाई करण्यासाठी बेस्ट आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त मोहीम हाती घेतल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या उपायांमुळे यंदा गणेशोत्सवादरम्यान वीजचोरी कमी होण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान बेस्टच्या विद्युत विभागाची भरारी पथके मुंबई शहर विभागात बेस्टच्या हद्दीत मोहिमा हाती घेत असतात. गेल्या वर्षी ४०० हून अधिक मंडळांवर अनधिकृत वीज वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली होती. या मंडळांविरोधात तक्रारही करण्यात आली होती. मात्र अद्याप या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले नाही. यंदा बेस्टने ही वीजचोरी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांसह संयुक्त आघाडी उघडली आहे. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय समितीच्या बैठकीत बेस्टचेही पदाधिकारी हजर होते. याबाबत अधिक माहिती देताना बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी पोलीस आणि बेस्ट यांनी संयुक्तरित्या घोषित केलेल्या चार कलमी कार्यक्रमावर प्रकाश टाकला.

आतापर्यंत बेस्टच्या हद्दीत १२५०पेक्षा जास्त मंडळांनी रीतसर बेस्ट प्रशासनाकडून तात्पुरती जोडणी घेतली आहे. हा आकडा १३०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तात्पुरत्या वीजजोडणीसाठी मंडळांना पोलीस परवानगी प्रमाणपत्रासह बेस्ट प्रशासनाकडे एक अर्ज करावा लागेल. हा अर्ज आल्यानंतर सर्व प्रक्रिया एका दिवसात पूर्ण केली जाते. चार वर्षांपूर्वी बेस्टची अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांची संख्या केवळ ९०० इतकी होती. गेल्या वर्षी १२४८ मंडळांनी बेस्टकडून अधिकृत वीजजोडणी घेतली होती.
 ओमप्रकाश गुप्ता, महाव्यवस्थापक, बेस्ट

बेस्टचा चार कलमी कार्यक्रम
*सर्व सार्वजनिक मंडळांना बेस्टच्या तात्पुरत्या वीज जोडणीच्या प्रक्रियेबाबत माहिती देणे.
*पोलिसांकडे नोंद झालेल्या सार्वजनिक मंडळांशी संपर्क साधून त्यांनी अधिकृतरित्या वीज जोडणी घेतली आहे का, याची तपासणी करणे. तशी नसल्यास मंडळांना अधिकृत वीज जोडणी घेण्याबाबत सूचना देणे.
*उत्सवादरम्यान मुंबई पोलिसांच्या विविध परिमंडळांतील उपायुक्त आणि बेस्टचे मुख्य दक्षता अधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली भरारी पथके तयार करणे. या पथकांद्वारे अधिकृत जोडणी न घेता वीज वापरणाऱ्या मंडळांवर कारवाई करणे.
*गेल्या वर्षी गुन्हा दाखल झालेल्या मात्र आरोपपत्र तयार नसलेल्या मंडळांविरोधातील चौकशी पूर्ण करून त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करणे.

विसर्जनासाठीही खास तरतूद
मुंबईतील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आणि विसर्जन सोहळा प्रेक्षणीय असल्याने या विसर्जनाच्या ठिकाणी बेस्टने खास विद्युतव्यवस्था उभारली आहे. बेस्टच्या हद्दीत एकूण ३३ विसर्जन ठिकाणे असून त्यापैकी गिरगाव चौपाटी, वरळी, दादर चौपाटी, शिवडी ही काही प्रमुख विसर्जन ठिकाणे आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी विसर्जनादरम्यान अपुऱ्या प्रकाशामुळे कोणतीही बाधा येणार नाही, याची काळजी बेस्टने घेतली आहे. या ठिकाणी बेस्टने हॅलोजन आणि इतर दिवे लावून हा परिसर विसर्जनाच्या चार दिवसांसाठी उजळून टाकला आहे.