ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकातील कलाकारांचे मधूर वादन, ‘गणपती बाप्पा मोरया’ चा गजर करीत लाडक्या गणरायाला सोमवारी (८ सप्टेंबर) भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. दहा दिवस गणरायाच्या सेवेत मग्न झालेले कार्यकर्ते आता विसर्जन मिरवणुकीच्या तयारीमध्ये गुंतले असून उद्या ठीक साडेदहा वाजता पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. विसर्जनासाठी रथ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून शनिवारप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीमध्ये पावसाने विश्रांती घ्यावी अशी गणेशभक्तांसह कार्यकर्त्यांची भावना आहे.
महापौर चंचला कोद्रे यांनी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे पूजन आणि आरती केल्यानंतर ढोल-ताशांच्या निनादात मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी कसबा गणपती मंदिरापासून सकाळी साडेआठ वाजता मिरवणूक निघणार असून टिळक पुतळ्यापाशी पोहोचेल. देवळाणकर बंधू यांच्या नगारावादनाचा गाडा, प्रभात बँडपथक, रमणबाग प्रशालेचे ढोल-ताशा पथक, पथनाटय़ाद्वारे गोहत्याबंदीचा प्रसार करणारे आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यकर्त्यांचे पथक, परदेशी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले रोटरी क्लबचे पथक आणि महिला कार्यकर्त्यांचे पथक मिरवणुकीमध्ये असेल. पारंपरिक चांदीच्या पालखीतून ही मिरवणूक काढण्यात येणार असून कार्यकर्ते हेच या पालखीचे भोई असतील.
पारंपरिक वेशभूषेतील अश्वारूढ युवती कार्यकर्त्यांसह न्यू गंधर्व बँडपथक मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. ताल आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके असतील. पारंपरिक चांदीच्या पालखीतून मिरवणूक निघणार आहे. नेहा पेंडसे, श्रुती मराठे, सौरभ गोखले यांच्यासह ४० कलाकारांचा सहभाग असलेले ढोल-ताशा पथक हे या मिरवणुकीचे आकर्षण असेल.
आकर्षक फुलांनी सजविलेल्या मयूर रथामध्ये श्री गुरुजी तालीम मंडळ हा मानाचा तिसरा गणपती विराजमान असेल. नगरकर बंधूंचे नगरावादन, लोकसेवा प्रतिष्ठानच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांचे पथक तसेच नादब्रह्म, शिवगर्जना आणि चेतक स्पोर्ट्स ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये असतील. श्रींच्या दर्शनासाठी रथासमोर आडवे येणाऱ्या भाविकांचा मान राखण्यातून वेळ होत असला तरी यंदा मिरवणूक लवकर संपविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील राहणार आहेत.
शिल्पकार विवेक खटावकर यांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या मयूर रथातून श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघणार आहे. लोणकर बंधू यांच्या नगरावादन गाडय़ामागोमाग स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी, हिंदू तरुण मंडळाचे ढोल-ताशा पथक आणि ‘लेक वाचवा’ या विषयावर प्रबोधन करणारे डॉक्टरांचे पथक मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे.
केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मानाच्या पाचव्या गणपतीची मिरवणूक केसरीवाडा येथून निघून टिळक चौकात पोहोचेल. तेथून लक्ष्मी रस्त्याने हा गणपती मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहे. लोकमान्यांच्या मंडालेहून सुटकेच्या शताब्दीनिमित्त इतिहासप्रेमी मंडळाने साकारलेला चित्ररथ हे मिरवणुकीचे आकर्षण असेल. बिडवे बंधू यांचा सनई-चौघडावादनाचा गाडा, श्रीराम, शिवमुद्रा, ब्रह्मनाद ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार असून फुलांनी सजविलेल्या पालखीत श्रींची मूर्ती ठेवून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघणार आहे.
मयूरेश्वर रथ आणि विश्वविजेता रथ  
हिंदूुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असा लौकिक असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या श्रींची मिरवणूक पारंपरिक लाकडी रथातून काढण्यात येणार आहे. खळदकर बंधूंचे नगरावादन, श्रीराम, आवर्तन, रुद्र गर्जना ही ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये असतील. भारताच्या भव्य नकाशाच्या पाश्र्वभूमीवर श्रीराम, श्रीकृष्ण आणि भारतमाता यांच्या मूर्तीचा समावेश असलेल्या ‘विश्वविजेता रथा’तून अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची मिरवणूक निघेल. संगम बँडपथक आणि शिवगर्जना ढोल-ताशा पथक मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. शिल्पकार विवेक खटावकर यांनी साकारलेल्या ‘मयूरेश्वर रथा’तून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची मिरवणूक निघणार आहे. रथावर मोरांच्या ७२ प्रतिकृती असून मोरांच्या चोचीमध्ये मोत्यांच्या माळा आहेत. श्रींच्या मूर्तीमागे विद्युत रोषणाईच्या माध्यमातून मोराचा फुललेला पिसारा गणेशभक्तांना पाहता येईल. यंदा प्रथमच पारंपरिक बल्बऐवजी एलईडी बल्बचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबरीने मिरवणुकीमध्ये ‘वृक्षसंवर्धन रथा’द्वारे झाडे लावण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सनई आणि नगरावादनाच्या गाडय़ामागोमाग स्व-रूपवर्धिनी ढोल-ताशा पथक, प्रभात आणि दरबार ही बँडपथके मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत.