धार्मिक कट्टरतेने दिवसेंदिवस सर्वत्र समाज विभक्त होत असताना येथील कुरुंदवाडच्या गणेशोत्सवाने मात्र धार्मिक सलोख्याची परंपरा तयार केली आहे. शहरातील सात मशिदींमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची पंरपरा गेल्या शतकभरापासून अव्याहतपणे सुरू आहे. शहरातील हिंदूंच्या जोडीने मुस्लिम समाजाच्या वतीने हा गणेशोत्सव गेल्या अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे.
कुरुंदवाड मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील हे नागरिक अत्यंत सलोख्याने हे दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात.
शहरातील बरागदार मशिदीमध्ये (सन्मित्र चौक) यंदा सात फूट उंचीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश प्रतिष्ठापना हा इथला कौतुकाचा विषय तर आहेच पण याच्या जोडीने या मशिदीमध्ये दरवर्षी ऐतिहासिक देखावे सादर केले जातात. शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र, बाजीप्रभू देशपांडे, अफजल खानाचा वध, पन्हाळागडावरून सुटका, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय असे विषय यासाठी आजवर निवडले होते. विलास निटवे, आण्णासाहेब चव्हाण, हिरासिंग रजपूत, उमर पखाली, ऐनुद्दिन गरगरे आदींनीही मशिदीमध्ये गणपती बसवण्याची परंपरा सुरू केल्याचे संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक बाबासाहेब भब्बीरे व शब्बीर भिलवडे यांनी सांगितले.
ढेपणपूर मशिदीमध्ये शिवाजी तरुण मंडळाच्या पुढाकाराने मशिदीमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या वेळी समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती व ऐतिहासक प्रसंगांवर आधारित जिवंत देखावे सादर केले जातात. कारखाना पीर मशिदीमध्येही गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सामाजिक प्रबोधन व ऐतिहासिक देखावे सादर करण्याची या मंडळाची परंपरा आहे. सातव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने श्रींच्या मूर्तीची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. कासीम पठाण या मंडळाचे अध्यक्ष आहेत. शेळके मशिदीमध्ये नवजीवन गणेश उत्सव मंडळाच्यावतीने गेल्या ५० वर्षांपासून अधिक काळ गणेशप्रतिष्ठापना केली जात आहे. ही प्रतिष्ठापना मशिदीच्या ऐन गाभाऱ्यात होते. अश्वारूढ गणेशमूर्ती  हे या मंडळाचे आकर्षण आहे. दरवर्षी ऐतिहासिक प्रसंग, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती आदी विषयांवर इथे जिवंत देखावे सादर केले जातात. कुडेखान मशिदीत गेल्या वर्षांपासून गणेशमूर्तीची प्रतिष्ठपना केली जाते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात इथे श्रींचे आगमन आणि विसर्जन होते. या उत्सवाच्या निमित्ताने मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजनही दरवर्षी केले जाते.
कुरुंदवाडमधील हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा हा सोहळा जिल्ह्य़ात सर्वत्र कौतुकाचा विषय असतो. गणेशोत्सवातून समाजाचे खऱ्याअर्थाने संघटन करणाऱ्या कुरुंदवाडच्या या सोहळय़ात पोलीस अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत अनेक अधिकारी सहभागी होत असतात. याबद्दल या मंडळांना अनेक बक्षिसेही मिळाली आहेत.