पुणे व पिंपरी महापालिका हद्दीतील सर्व बस स्थानकांमधून पीएमपीतर्फे गणेशोत्सवासाठी रात्र सेवा सुरू करण्यात आली असून बुधवार (१८ सप्टेंबर) पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. ही विशेष सेवा असल्यामुळे त्यासाठी पाच रुपये जादा तिकीट दर द्यावा लागेल.
गणेशोत्सवात पुणे परिसरातून तसेच परगावांहून येणाऱ्यांच्या सोयीसाठी दरवर्षी ही सेवा सुरू केली जाते. रात्री दहा ते एक या वेळेत ही सेवा बुधवापर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच स्वारगेट ते निगडी या मार्गावर या काळात प्रवाशांसाठी जादा गाडय़ा सोडण्यात येत आहेत. स्वारगेट बस स्थानक, स्वारगेट डेपो बस स्थानक, महात्मा गांधी बस स्थानक, हडपसर गाडीतळ, मोलेदिना हॉल, डेंगळे पूल, मनपा भवन, मनपा नदीकाठचे बस स्थानक, काँग्रेस भवन, डेक्कन जिमखाना, कात्रज, इंदिरानगर अप्पर, धनकवडी, निगडी, भोसरी आणि चिंचवड या बस स्थानकांमधून विविध मार्गावर रात्र सेवेतील जादा गाडय़ा सोडल्या जात आहेत.
शहरातील काही मुख्य रस्ते सायंकाळपासून बंद ठेवले जात असल्यामुळे बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्ता या चार रस्त्यांवरील पीएमपी गाडय़ांच्या मार्गात आवश्यकतेनुसार बदल करण्यात आल्याचेही कळवण्यात आले आहे.