प्रकाश आमटे, बालमुरली कृष्णन, आर्य संगीत प्रसारक मंडळ, नरेंद्र सिंग आणि ज्ञानोबा लांडगे यांना या वर्षीचे पुणे फेस्टिव्हल अॅवॉर्ड देण्यात येणार असल्याचे पुणे फेस्टिव्हलचे समन्वयक कृष्णकांत कुदळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन १३ सप्टेंबरला केंद्रीय दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान आणि कायदा मंत्री कपिल सिब्बल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दरवर्षी देण्यात येणारे पुणे फेस्टिव्हल अॅवॉर्ड यावर्षी ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, ज्येष्ठ गायक बालमुरली कृष्णन, सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची आयोजक संस्था आर्य संगीत प्रसारक मंडळ, बँक ऑफ महाराष्ट्रचे नरेंद्र सिंग आणि बैलगाडा शर्यतींचे आयोजक ज्ञानोबा लांडगे यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुणे फेस्टिव्हलच्या रौप्यमहोत्सवानिमित्त पुण्यातील मानाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सन्मान करण्यात येणार आहे. कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गुरुजी तालीम सार्वजनिक मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, केसरीवाडा गणपती मंडळ, जिलब्या मारुती मित्रमंडळ, हुतात्मा बाबूगेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ या मंडळांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या वर्षी फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी ‘राधा रासबिहारी’ हा बॅले सादर करणार आहे. त्याचबरोबर विविध कला, क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रम १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहेत.