गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणेशाची विविध रुपे रंगावलीच्या माध्यमातून साकारण्याचा उपक्रम यंदा रंगावलीकार जगदीश चव्हाण यांनी केला आहे आणि गणेशोत्सवात भरवल्या जाणाऱ्या त्यांच्या प्रदर्शनचा यंदा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. पंचवीस वर्षांपूर्वी विश्रामबागवाडय़ात सुरू झालेल्या या उपक्रमातून चव्हाण यांनी सुंदर रंगावली रेखाटणारे शेकडो कलाकारही तयार केले आहेत.
जगदीश चव्हाण यांनी काढलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शन दरवर्षी गणेशोत्सवात भरवले जाते आणि यंदा प्रदर्शनाचे पंचविसावे वर्ष आहे. चव्हाण महापालिकेतील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांची कला पाहून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना सर्वप्रथम विश्रामबागवाडय़ात प्रदर्शन भरवण्याची सूचना केली आणि सर्व साहाय्यदेखील केले. त्यातून चव्हाण यांचा प्रदर्शनाचा उपक्रम सुरू झाला आणि तो सलग पंचवीस वर्षे सुरू आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही चव्हाण यांची रंगावली पाहून, आता थांबू नका, उपक्रम असाच सुरू ठेवा, अशी शाबासकी दिली होती आणि त्यामुळेच चव्हाण यांना हुरुप आला. सुरुवातीला सलग सात वर्षे हे प्रदर्शन विश्रामबागवाडय़ात भरत होते. त्यानंतर पुढे तेरा वर्षे कुमठेकर रस्त्यावरील शुभमंगल कार्यालयात प्रदर्शन भरले. त्याबरोबरच काही वर्षे अन्यही काही ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आले.
प्रदर्शनाच्या उपक्रमामुळे अनेक नवे तरुण या कलाप्रकाराशी जोडले गेले. त्यातून वर्षभर काही ना काही उपक्रम सुरू असतात. आतापर्यंत चारशे विद्यार्थ्यांनी हे शिक्षण घेतले असून त्यांची कलाही ठिकठिकाणी सादर होत असते, असे मनोगत चव्हाण यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ बोलताना व्यक्त केले. चव्हाण यांचे हे रौप्यमहोत्सवी प्रदर्शन कुमठेकर रस्त्यावरील लक्ष्मण भुवन मंगल कार्यालयात भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन ६ सप्टेंबर पर्यंत रोज दुपारी दोन ते रात्री अकरा या वेळेत खुले राहणार आहे.