गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. सुमारे साडेचार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याचप्रमाणे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूक कोंडीला सामना करावा लागू नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून ४६४ वाहतूक पोलीस कर्मचारी अहोरात्र वाहतुकीवर लक्ष ठेवून असणार आहेत. गणरायाच्या आगमनासाठी पालिका यंत्रणा देखील सज्ज झाली असून पालिका आयुक्तांनी शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले आहेत. तसेच महावितरण मंडळाना वीजजोडणी मिळावी म्हणून ऑनलाइन अर्जाची सोय केली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील परिमंडळ एकमध्ये १६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून २१ हजार ४६ घरगुती गणपती आहेत. याचप्रमाणे परिमंडळ दोनमध्ये १९७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून ३५ हजार ५०० घरगुती गणपती आहेत. पोलीस आयुक्तालयातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना पोलिसांकडून सूचना करण्यात आल्या आहेत. यात मंडप आणि मंडप आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्वयंसेवक नेमणे, आवश्यकता असल्यास सुरक्षा रक्षक नेमणे आदी सूचनांचा समावेश आहे. तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी रोज गणेशोत्सव मंडपांना भेट देणार असून तेथील सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. उत्सव काळात सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या रजा बंद करण्यात आल्या असून आयुक्तालयातील साडेचार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी दिली. याशिवाय राज्य राखीव बल, शीघ्र कृती दल आदींच्या तुकडय़ादेखील बंदोबस्तासाठी मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय विशेष क्रिएटिव्ह फोर्स पथक तयार करण्यात आले असून त्यांचे प्रत्येक घडामोंडींवर लक्ष असणार आहे. याशिवाय महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापूर्वी गुन्हेगारी पाश्र्वभूमीवर असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. तसेच वाशी खाडी पूल, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आम्रमार्ग, राष्ट्रीय महामार्ग यावर अहोरात्र बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी दिली आहे. याशिवाय तुर्भे, कंळबोली सर्कल, पळस्पे फाटा, खारपाडा टोलनाका या ठिकाणी राहुटी तसेच नागरिकांसाठी रस्त्याची व इतर आवश्यक माहिती देण्यासाठी तुर्भे, किल्ला जंक्शन, या ठिकाणी पी. ए. सिस्टीम लावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांनी पनवेल शहरात न जाता शहराबाहेरील पळस्पे फाटा येथून पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी त्यांच्यासह २ साहाय्यक पोलीस आयुक्त, ९ पोलीस निरीक्षक, २८ साहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि ४२४ पोलीस कर्मचारी अहोरात्र तैनात असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

system ready for ganesh festival