गिरिजात्मज (लेण्याद्री) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला ‘गिरिजात्मज’ हे नांव मिळाले.
कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत. त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासाठी ३०७ पायरया चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात. हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख ‘जीर्णापूर’ व ‘लेखन पर्वत’ असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नांव पडले.
पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखडय़ावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे. सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणं आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे.या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाही. ही गुहा अशाप्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.
या देवस्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरील सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते.
स्थान- पोस्ट गोळेगाव, ता.जुन्नर जि.पुणे
अंतर- मुंबई-कल्याण-माळशेजघाट-मढ-लेण्याद्री १८० कि.मी, पुणे-नारायणगाव-जुन्नर-लेण्याद्री १४० कि.मी
लेण्याद्रीपासून इतर अष्टविनायकांचे अंतर- ओझर १७ कि.मी, रांजणगाव १२० कि.मी, मोरगाव १५५ कि.मी, थेऊर १३२ कि.मी, सिद्धटेक १८० कि.मी, महड १३५ कि.मी, पाली १७५ कि.मी
संग्रहित लेख, दिनांक 16th Sep 2013 रोजी प्रकाशित
अष्टविनायक सहावा गणपतीः लेण्याद्रीचा गिरीजात्मज
अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे.

First published on: 16-09-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashtavinayak sixth ganpati