गणेशोत्सवाचा कालावधी हा प्रचंड उर्जा आणि उत्साहाचा असतो. या वर्षीही गणेशाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहेच पण राज्यासह देशात आणि परदेशातही तो मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अशातच आता गणपती बाप्पाचा जयघोष करीत ब्रुसेल्स येथे बेल्जियम मराठी मंडळाच्या वतीने गणेशोत्सव धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. तर हा गणेशोत्सव साजरा केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये लोक मनोभावे गणपती बाप्पाचा जयघोष करताना दिसत आहेत. तर येथील गणपती मंडळाने ब्रुसेल्स येथील वोल्युवे या भागाच्या पब्लिक चौकात ढोल , ताशा आणि लेझीम यांच्या गजरात मोठ्या थाटात गणपती मिरवणूक काढली होती. करोनाचे सावट दूर झाल्यावर तब्बल ३ वर्षांनी या सोहळ्यासाठी अनेक लोकांना या गणेशोत्सवासाठी हजेरी लावली आणि मनमुराद आनंद लुटला. मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले तरुण - तरुणी तसेच वयोवृद्ध नागरिक सर्वांचे लक्ष वेधत होते. पाहा व्हिडीओ- हेही वाचा- History and culture of Ganesh festival: भारताआधीच आग्नेय आशियातील देशांमध्ये गणपती लोकप्रिय का झाला? तिथे गणपती कसा पोहोचला? मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन - मंडळातर्फे अथर्वशीर्ष पठण, महाआरती, आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या देशापासून दूर राहणाऱ्या लहान मुलांना आपली संस्कृती अनुभवता यावी आणि जगता यावी यासाठी हे मंडळ विशेष प्रयत्न करते. त्यानुसार लहान मुलांनी गणेश नमन, कोळी नृत्य आणि वासुदेवाची स्वारी असे विविध कला गुणदर्शन प्रस्तुत केले. तसेच यावेळी लाईव्ह शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. ब्रुसेल्स येथील भारतीय दूतावासाचे राजदूत (ambassador) संतोष झा यांनी मुख्य पाहुणे म्हणून कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी बेल्जियम मराठी मंडळाच्या विविध उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.