Ganesh Utsav 2023 : लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात गणेशाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण आतुर झाले आहेत. बाप्पाच्या आगमनाला काही दिवस शिल्लक राहिले असताना राज्यासह देशात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू केली आहे. मोठमोठ्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे मोठ्या मिरवणुकीने आगमन होते. या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशाचे वादन मोठ्या प्रमाणात केले जाते. ढोल-ताशाच्या तालावर अनेक लोक ठेका धरतात. पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये अनेक ढोल-ताशा पथके आहेत; जी गणेशोत्सवामध्ये वादन करतात. शिवाय ही पथके महिनाभर आधी सरावाला सुरुवात करतात. ढोल-ताशा पथक हे शहरातील गणपती मिरवणुकांचे प्रमुख आकर्षण असतात. तर ही ढोल-ताशा पथके कधी अस्तित्वात आली आणि त्यांचा इतिहास नेमका काय आहे ते जाणून घेऊ.
ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी सांगितले की, मध्ययुगीन काळापासून ढोल-ताशा हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्याचं म्हटलं जातं. ढोल हा युद्धांदरम्यान लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी वापरला जायचा. तसेच ढोल हे अनेकदा मंगल वाद्य आणि रणवाद्य म्हणूनही वापरलं जायचं.
कोणी केली सुरुवात?
आप्पाजी पेंडसे या नावाने प्रसिद्ध असलेले डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे यांनी, पुण्यात स्थापन केलेल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशाला या शाळेच्या विद्यार्थ्यांमधून प्रथम ढोल-ताशा पथकाला सुरुवात केली. १९७५ मध्ये ज्ञान प्रबोधिनी शाळेत त्यांनी मुलींच्या पहिल्या ढोल पथकाची सुरुवात केली. ज्ञान प्रबोधिनीचे पथक तयार केल्यानंतर आप्पाजी पेंडसे यांनी विमलाबाई गरवारे प्रशाला, नूतन मराठी विद्यालय (NMV) प्रशाला व रमणबाग प्रशाला यांसारख्या इतर शाळांनाही भेट दिली; जिथे ज्ञान प्रबोधिनीच्या सदस्यांनी शाळेचे पथक सुरू करण्यास मदत केली.
ढोल-ताशा पथकांची लोकप्रियता वाढीस लागल्यानंतर लाऊडस्पीकरवर वाजणारी गाणी कमी व्हायला सुरुवात झाली. काही काळाने ढोल-ताशा पथक हे केवळ शालेय पथक न राहता, अनेक तरुणांनी एकत्र येऊन स्वतःचे पथक तयार करायला सुरुवात केली. शिवगर्जना नावाचे पथक पुण्यात २००२ मध्ये सर्व नूतन मराठी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केले होते.
पुण्यातील प्रसिद्ध ढोल-ताशा पथक
ज्ञान प्रबोधिनीनंतर अनेक शाळांनी त्यांच्या ढोल-ताशा पथकांची स्थापना केली. विमलाबाई गरवारे प्रशाला, नूतन मराठी विद्यालय आणि रमणबाग प्रशाला या शाळांनीदेखील ढोल-ताशा पथकांची स्थापना केली. आज पुण्यात अनेक प्रसिद्ध ढोल-ताशा पथके आहेत. शिवमुद्रा, शिवगर्जना, श्रीराम, परशुराम, शौर्य, नादब्रह्म, रुद्रगर्जना, कलावंत यांसारखी अनेक ढोल-ताशा पथके दर वर्षी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत ढोल-ताशांचे वादन करतात. २ ऑक्टोबर १९९९ रोजी समर्थ प्रतिष्ठान या ढोल-ताशा पथकाची स्थापना झाली. तर शिवगर्जना या ढोल-ताशा पथकाची सुरुवात २००२ मध्ये झाली. कलावंत हे पुण्यातील प्रसिद्ध ढोल-ताशा पथक आहे. त्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार ढोल-ताशाचे वादन करतात.