गणेश उत्सव सुरु झाला आहे. अशात डी.जे., ढोल ताशे या सगळ्यांच्या विरोधात एक वातावरण तयार झालं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विद्यानंद बापट. त्यांनी जी चळवळ सुरु केली त्या चळवळीला मूर्त स्वरुप आलं आहे. दरम्यान पुणे फर्स्ट या फेसबुकपेजवरचा एक व्हिडीओही याच विषयावरचा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ढोल-ताशे आणि लाऊड स्पीकर्सचा कसा त्रास होतो याबाबत डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडीओ आहे.

काय आहे या व्हिडीओत?

या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की काही कार्यकर्ते हे वर्गणी मागायला एका घरात येतात. हे कार्यकर्ते आलेले असताना एक मुलगी अभ्यास करताना दाखवली आहे. तसंच हे कार्यकर्ते या मुलीच्या आईला सांगतात मागच्या वर्षी २०० रुपये दिले होते. या वर्षी तुम्ही ५०० रुपयांची वर्गणी द्या. ज्यावर मुलीची आई सांगते की हो, मी पैसे आणते दोन मिनिटं थांबा. मुलीची आई पैसे आणायला जाते तेव्हा अभ्यास करणाऱ्या मुलीची हे चौकशी करतात पण ती काहीही प्रतिसाद देत नाही. तेव्हा आपसात म्हणतात की अरे वा मुलगी किती एकाग्र होऊन अभ्यास करते आहे. तेवढ्यात मुलीची आई येते. ती एक फाईल दाखवते. फाईल असते त्याच लहान मुलीची. या मुलीला ढोल-ताशे आणि लाऊड स्पीकरमुळे एका कानाने ऐकू येणं बंद झालेलं असतं. तर दुसऱ्या कानाला मशीन लावल्याशिवाय ऐकू जात नाही. तुम्हाला असा त्रास होऊ नये असं मुलीची आई म्हणते. त्यानंतर या वर्गणी मागणाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. गोंगाट नको, उत्सव हवा असं म्हणत एक संदेश देण्यात आला आहे. PUNE FIRST ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

स्पीकर्सच्या भिंती का हव्यात? त्यामुळे कुणाला तरी बहिरेपणा येऊन मोठी किंमत आयुष्यभरासाठी मोजावी लागू शकते असा एक मौलिक संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंगाट हाच उत्सव समजून वागणाऱ्या सगळ्यांसाठीच हा व्हिडीओ म्हणजे डोळ्यात घातलेलं झणझणीत अंजन आहे यात शंका नाही. ही शॉर्ट फिल्म युट्यूब आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नेटकऱ्यांनी काय म्हटलं आहे?

कोणताही आक्रस्ताळेपणा न करता डोळ्यांत अंजन घालणारी शॉर्ट फिल्म आहे असं एका युजरने म्हटलं आहे. सगळ्यांना विचार करायला लावणारी शॉर्ट फिल्म असंही एका युजरने म्हटलं आहे. पुणेकरांच्या मनातलं बोलणारी ही शॉर्ट फिल्म असं म्हणतही एका नेटकऱ्याने कौतुक केलं आहे. या शॉर्ट फिल्मवर खूप सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.