आम्ही चालवू हा पुढे वारसा..!

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिक एकत्र येऊ लागले

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मुंबईतील गिरगावमधील केशवजी नाईकांच्या चाळीत पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत गेली आणि त्यानंतर अवघी मुंबापुरी गणेशमय झाली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिक एकत्र येऊ लागले आणि त्यातून समाजप्रबोधनाचे कार्य घडू लागले. सामाजिक बांधिलकी जपून जनजागृती, समाजप्रबोधन आणि विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मुंबईतील काही सेवाव्रती गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा ‘लोकसत्ता’ने घेतलेला आढावा.

विद्यार्थ्यांचा ‘आधार’

गिरगावातील निकदवरी लेनमध्ये १९२८ मध्ये काही धुरीणांनी एकत्र येऊन निकदवरील लेन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. गणेश विसर्जनानंतर न विरगळलेल्या मूर्तीच्या अवयवांचे विसर्जनस्थळी टिपल्या जाणाऱ्या छायाचित्रांविरोधात मंडळाने आवाज उठविला होता. याच चळवळीतून निकदवरी लेनमध्ये बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा जन्म झाला होता. आजघडीला ही समन्वय समिती मुंबईमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा आधारस्तंभ बनली आहे. मंडळ ‘आधार’ या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी दत्तक योजना राबवित आहे. गरीब विद्यार्थ्यांना १२ वी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा वसा या मंडळाने घेतला आहे.   रक्तदान, नेत्रचिकित्सा, आरोग्य शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे.

जनजागृतीचा वसा

शिवडी मध्यविभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महिला बचत गटाची स्थापना करुन महिलांसाठी एक नवे दालन खुले केले आहे. विद्यार्थी दत्तक योजना, आरोग्य चिकीत्सा शिबीर, गुणगौरव, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असे विविध उपक्रम या मंडळातर्फे आयोजन करण्यात येत असते. त्याशिवाय एड्स विरोधात जनजागृतीची मोहिमही मंडळाने हाती घेतली आहे.

दिनदुबळ्यांचा कैवारी

भांडुप (पश्चिम) येथील विकास मंडळ सुरुवातीपासूनच गरीब, अंध, अपंग, मतिमंद, तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करीत दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. कुपोषित, मनोरुग्ण, अनाथालयांसाठी हे मंडळ आधार बनले आहे. मुंबईमध्ये हिवतापाच्या साथीने डोके वर काढले त्यावेळी मंडळ पालिकेच्या मदतीला धावून गेले होते. डासांच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मंडळाने कीटनाशक विभागाला जंतुनाशक फवारणी यंत्र उपलब्ध करुन आपली सामाजिक बांधिलकी व्यक्त केली होती. गावांमध्ये जलसाक्षरता आणि जलसंवर्धनाच्या मोहिमेलाही हातभार लावला आहे.

पर्यावरण रक्षणाचा वसा

साधारण २७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विलेपार्ले (पूर्व) येथील श्रद्धानंद रोड परिसरातील बाळ गोपाळ मित्र मंडळाने पर्यावरण संरक्षणाचा वसा घेतला आहे. गेली काही वर्षे मंडळाचे कार्यकर्तेच टिशू पेपरपासून गणेशमूर्ती साकारत आहेत. समाजप्रबोधन आणि वसुंधरेच्या संवर्धनासाठी पर्यावरणाच्या रक्षणाचा वसा सांभाळत मंडळाची वाटचाल सुरू आहे.

गणेशोत्सवाचे व्रत

‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था केशवजी नाईकांच्या चाळी’ या मंडळाने १९३५ मध्ये गणेशोत्सवासाठी घटना तयार केली आणि तिची आजतागायत अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. देणगी कोणाकडून घ्यावी, गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबत घटनेमध्ये नियमावली तयार करण्यात आली असून त्यानुसारच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लोकमान्य व्याख्यानमालेच्या निमित्ताने तज्ज्ञ मंडळींमार्फत विविध विषय समाजापर्यंत पोहोचविण्याचा वसा मंडळाने घेतला. त्रिपोरी पौर्णिमेनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या दीपोत्सवात ‘तमसोमा ज्योतिर्गमय’ कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात मोलाचे कार्य करणाऱ्या, परंतु प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या व्यक्तींचा गौरव करण्याचा संकल्प मंडळाने सोडला आहे. भावी पिढीला लोकमान्य टिळकांचे कार्य, त्यांचे विचार समजावेत या दृष्टीने मंडळाने ‘आठवणी लोकमान्यांच्या’ आणि स्पुर्तिदायी विचार’ या दोन पुस्तिका मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित केल्या. त्याचे समाजातील विविध घटकांमध्ये विनामूल्य वाटप केले. सामाजिक विषयांवर शाळांमधून खुल्या स्पर्धाही मंडळातर्फे घेतल्या जातात.

‘लालबागच्या राजा’चा मदतीचा हात

जमा होणाऱ्या निधीतून ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ मूत्रपिंड विकाराने त्रस्त रुग्णांसाठी अवघ्या १०० रुपयांमध्ये डायलिसीस सेवा उपलब्ध करून देते. मंडळाने सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना ‘रुग्ण सहाय्य योजने’च्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने ‘लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले आहे. ‘लालबागचा राजा प्रबोधिनी’मध्ये सानेगुरुजी अभ्यासिका, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय, संत ज्ञानेश्वर पुस्तकपेढी, स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती, विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र व अभ्यासवर्ग, इंग्रजी संभाषण वर्ग असे उपक्रम राबवून मंडळाने विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी एक दालन खुले केले आहे. दाटीवाटीने उभ्या असलेल्या चाळी, वस्त्यांमध्ये अभ्यास करण्यासाठी पोषक पातावरण नसल्याची बाब मंडळाने लक्षात घेऊन मंडळाने वातानुकूलित साने गुरुजी अभ्यासिका सुरू केली असून सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत खुल्या राहणाऱ्या या अभ्यासिकेचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आहेत. विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील न्यूनगंड दूर करण्यासाठी इंग्रजी संभाषण वर्गही सुरू केले आहेत. समाजाच्या विविध स्तरातून सनदी आणि प्रशासकीय अधिकारी घडावेत या उद्देशाने निरनिराळे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच वाचन संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. साहित्य संपदेपासून वैद्यकीय, औषधशास्त्र, अभियांत्रिकी, कायदा, व्यवस्थापन आदींसह विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके या ग्रंथालयात विनामूल्य उपलब्ध करण्यात येतात. २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या प्रलयंकारी महापुरात रायगड जिल्ह्य़ातील महाड तालुक्यातील जुई गावात दरड कोसळून ६० घरे गाडली गेली होती. मंडळाने सुमारे ५० लाख रुपये खर्च करुन ४०० चौरस फुटाची ३० घरे बांधून देत जुई गावाच्या पुनर्वसनाला हातभार लावला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ganesh mandals helps to needy people

ताज्या बातम्या