कोल्हापूर, सांगलीत मशिदीत गणेश प्रतिष्ठापना

सामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक देखावेसुद्धा लक्ष्यवेधी ठरतात.

धार्मिक विद्वेषाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याची चिंता निर्माण होत असताना कृष्णाकाठी कुरुंदवाड या छोटेखानी शहरात गणेशोत्सवाने धार्मिक ऐक्याची प्रचिती घडवण्याचे काम केले आहे. येथील गणेशोत्सवाला शतकभराची सलोख्याची परंपरा तयार झाली असून, शहरातील पाच मशिदींमध्ये गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या शहरात मुस्लिमांची संख्या लक्षणीय असली तरी हिंदूंच्या हातात हात घालून मुस्लिम समाजाच्या वतीने गणेशोत्सव अनेक वर्षांपासून अखंडपणे साजरा केला जातो. सामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक देखावेसुद्धा लक्ष्यवेधी ठरतात.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरात अंदाजे पन्नास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये पाच मशिदींत सार्वजनिक मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. कुडेखान मशिदीत कुडेखान पीर गणेशोत्सव मंडळ, ढेपणपूर  मशिदीत शिवाजी तरुण मंडळ, बरागदार मशिदीत सन्मित्र मंडळ, शेळके मशिदीमध्ये शिवप्रेमी नवजवान मंडळ आणि कारखाना मशिदीत कारखाना पीर गणेशोत्सव मंडळ यांनी गणपतीची मनोभावे प्रतिष्ठापना केली आहे. गणेशोत्सव साजरा करण्यात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम युवकांचा समावेश असतो. उत्सवाच्या तयारीपासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत मुस्लिमांचा सहभाग हिरिरीने असतो.

स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना समाजातील सर्व घटक एकत्रित यावेत, असा व्यापक विचार मांडला गेला होता. त्याला कुरुंदवाड शहराने प्रतिसाद दिला. येथील भारत गणेशोत्सव मंडळाचे यंदा १०१वे वर्ष आहे. श्री गणपती मंदिरातील श्री गणपत्युत्सव मंडळास यंदा ११९ वष्रे होत आहेत. यात सुरुवातीपासून मुस्लिम सहभागी होत, पण नंतर पुढचे पाऊल टाकत थेट मशिदीत गणरायाची प्रतिष्ठापना होऊ लागली. धार्मिक ऐक्याचे हे मूळ आता खोलवर रुजले आहे. गणेशोत्सवात धार्मिक एकात्मतेचे इतके तादात्म्य पावलेले उदाहरण अन्यत्र क्वचितच पाहायला मिळते. ५० वर्षांहून अधिक वर्षांची ही धार्मिक ऐक्य टिकवणारी परंपरा आहे. मुळात कुरुंदवाड हे शहर राष्ट्रीय एकात्मतेचे आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारे आगळे शहर आहे. येथे गणेशोत्सवात मुस्लिम ढोल वाजवण्यासाठी पुढे असतात, तर मोहरममध्येही हिंदूंच्या खांद्यावर पीर नाचवले जातात.

मंदिरातही गणेशोत्सव

देशात कोठे धार्मिक द्वेषाच्या ज्वाळा भडकतात, पण या शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्य आजवर कृष्णेच्या पाण्याप्रमाणे संथपणे वाहात आले आहे. या शहरात हिंदू-मुस्लिम वादाने कधीही गंभीर स्वरूप घेतले नाही. या बरोबरच श्री दत्त मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री सद्गुरू पंत मंदिर, श्री काळाराम मंदिर, मारुती मंदिरात भारत गणेशोत्सव मंडळ, श्री लक्ष्मी मंदिर या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

देखाव्यात विविधता

गणेशोत्सव काळात मशिदीत गणराया समोर विविध प्रकारचे देखावे सादर केले जातात.  समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती व ऐतिहासक प्रसंगांवर देखावे असतात. शिवाजीमहाराजांचे जीवनचरित्र, बाजीप्रभू देशपांडे, अफजलखानाचा वध, पन्हाळगडावरून सुटका, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय असे विषय यासाठी आजवर निवडले गेले, तसेच अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती आदी विषयांवर इथे जिवंत देखावे सादर केले जातात.

वाळव्यातही प्रतिष्ठापना

सांगली- वाळवा तालुक्यातील गोटिखडी या गावी मशिदीमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून उत्सवादरम्यान यंदा बकरी ईद असल्याने या दिवशी गणेशाच्या मूर्तीशेजारी केवळ नमाज पठण करून बकरी ईदची कुर्बानी उत्सवानंतर करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. मशिदीमध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे हे ३८ वे वर्ष आहे. गोटिखडीतील झुंजार चौकामध्ये न्यू गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची स्थापना गेली ३८ वष्रे मशिदीमध्ये करण्यात येते. यंदाही या मूर्तीची प्रतिष्ठापना इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे यांच्या हस्ते आणि आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.  गणेशाची प्रतिष्ठापना करीत असताना मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके, उपाध्यक्ष सचिन शेजावळे, सचिव राहुल कोकाटे, जिल्हा परिषद सदस्या राजश्री एटम, लालासाहेब थोरात, अर्जुन कोकाटे, विनायक पाटील, दस्तगीर इनामदार, रफिक मुलाणी, सलीम लेंगरेकर, महंमद पठाण, मज्जीद जमादार, लतीफ लेंगरेकर, रहीम जमादार, लखन पठाण, गब्बर इनामदार आदी कार्यकत्रे उपस्थित होते. यंदा गणेशोत्सवाच्या कालावधीतच बकरी ईद येत असल्याने या दिवशी गणेशाची स्थापना करण्यात आलेल्या मशिदीमध्ये ईदची नमाज अदा करण्यात येणार आहे. मात्र बकरी ईदची कुर्बानी गणेश विसर्जन होईपर्यंत न करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे.

((   कुरुंदवाडमधल्या अनुक्रमे (डावीकडून) शेळके, कुडेखान आणि कारखाना पीर या तीन मशिदींमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशमूर्ती.  )))

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ganpati festival mosque kolhapur

ताज्या बातम्या