भारतात ठिकठिकाणी गणेशोत्सवाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. घरागरांतून आणि मंडळातून मोठ्या भक्तीभावाने हा उत्सव साजरा करण्यात आला. पण आपल्या मातीपासून कोसो दूर असणाऱ्या परदेशातील मराठी मंडळींनाही आपल्या घरची आठवण येते. अशावेळी सातासमुद्रापार असलेल्या मंडळींही मोठ्या उत्साहात मराठी सण साजरे करत असतात. आपली संस्कृती परदेशातही जपता यावी यासाठी येथील मराठी बांधव एकत्र येत हे उत्सव साजरे करतात. नुकताच फ्रान्समधील मराठी मंडळात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाचे हे अकरावे वर्ष असून लहान-थोरांच्या उपस्थितीत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होत

याठिकाणी पुरेशी साधने नसल्याने आहे त्या परिस्थितीत सण साजरे करण्याचे कसब येथील मंडळी अतिशय नेमकेपणाने साधतात. येथील मराठी मंडळातील सभासदांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मोठे सभागृह घेऊन यंदाचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल केळकर यांनी टाळ गजराच्या साथीने गणेशाची मूर्ती पूजेच्या स्थानी आणली. यानंतर गणेशाची पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी गणेशाची आराधना आणि स्तुतीपर श्लोक, स्तोत्र, कथा, कविता आणि गीते सादर करण्यात आली. येथील मराठी मंडळींनी विविधगुणदर्शन सादर केले. मंडळातील लहानग्यांनी सादरीकरणात भाग घेऊन उत्तम कार्यक्रम सादर केले. संस्कृत श्लोक, मराठी गीते, भरतनाट्यम, इंग्लिश कथा आणि नाटीका अशा सादरीकरणाने कार्यक्रमाला सांस्कृतिक रुप आले होते. कार्यक्रमाला शंभरहून अधिक सभासद व पाहुण्यांनी हजेरी लावली होती. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाल्याचे प्रियांका देवी- मारुलकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनला माहिती देताना सांगितले.