Jyeshtha Gauri Avahana 2023: घरोघरी गणरायाचे उत्साहात आगमन झालेलं आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे ती गौरींच्या आगमनाची. घरोघरी गौरींच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. वेगवेगळ्या फराळांच्या तयारीपासून ते दारातील रांगोळीपर्यंत, घरोघरी स्वागताच्या तयारीचे चित्र पाहायला मिळेल. आज गुरुवारी २१ सप्टेंबर रोजी अनेकांच्या घरात गौरींचे स्वागत केले जाईल.
ज्येष्ठ गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण, गणेशोत्सवादरम्यान उत्साहात साजरा केला जातो. या सणाची सुरुवात ज्येष्ठा गौरी आवाहनाने होते आणि त्यानंतर गौरी पूजन व गौरी विसर्जनाने समाप्ती होते. तीन दिवस हा सण साजरा केला जातो. यंदा २१ सप्टेंबर रोजी या सणाला सुरुवात झाली आहे, जी २३ सप्टेंबर रोजी समाप्त होईल.
ज्येष्ठ गौरी आवाहन २०२३ : शुभ मुहूर्त
- ज्येष्ठ गौरी आवाहन गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३
- ज्येष्ठ गौरी आवाहन मुहूर्त – सकाळी ०६:०९ वाजल्यापासून ते दुपारी ३.३५ पर्यंत
- ज्येष्ठ गौरी पूजन शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३
- ज्येष्ठ गौरी विसर्जन शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३
- अनुराधा नक्षत्र सुरुवात – २० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०२:०९ वाजल्यापासून
- अनुराधा नक्षत्र समाप्ती – २१ सप्टेंबर २०२३, दुपारी ०३:०३५ वाजेपर्यंत
Jyeshtha Gauri Avahana 2023: ज्येष्ठ गौरी आवाहनाचे महत्त्व
या दिवशी माता गौरी म्हणजे माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धरतीवर अवतरित झाली होती, असे मानले जाते. गणरायाप्रमाणेच गौरींचेदेखील उत्साहत स्वागत होते. यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते. बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात. यामध्ये शाडू, पितळे, कापडी, फायबरचे असे काही प्रकार पाहायला मळातात. काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात, तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते. तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रितही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते. प्रत्येक कुटुंबात आपआपल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात. मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते.
गौरी आवाहन
गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. पहिल्या दिवशी तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरून गौरींना घरात आणले जाते. यावेळी ”गौरी आली, सोन्याच्या पावली…गौरी आली, चांदीच्या पावली…गौरी आली, गाई वासराच्या पावली…गौरी आली, पुत्र-पौत्रांच्या पावली…” असे म्हणत गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन साड्या आणि दागदागिने घालून सजवले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवद्य दाखविला जातो.
गौरी पूजन
दुसऱ्या दिवशी, जेष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते आणि गोडधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरणाचा स्वयंपाक असे पंचपक्वान्न केले जातात. या दिवशी सवाष्ण आणि ब्राह्मणांना जेवायला बोलावले जाते. तसेच गौरींना लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचाही नैवद्य दाखविला जातो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहिली जातात. सायंकाळी विवाहित स्त्रियांना हळदी-कुंकवासाठी बोलावले जाते. तसेच कुटुंबातील सदस्य, नातेवाईंकाना आणि मित्र-मैत्रिणींना गौरीच्या दर्शनासाठी घरी बोलावतात.
ओवसा
अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओवसा भरण्याची पद्धत असते. ओवसा म्हणजे गौरीला ओवाळणे किंवा ओवसणे , ज्याला ववसा असेही म्हटले जाते. या परंपरेद्वारे घरातील सुनेला मानसन्मान दिला जातो. त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसेही दिले जातात.
गौरी विसर्जन
तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते. काही जणांकडे गौरीसह गणरायाचे विसर्जन केले जाते, तर काही जणांकडे विसर्जन झाल्यानंतर १० दिवसांनीच गणपतीचे विसर्जन होते.