रत्नागिरी : गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन मुंबई, ठाणे आणि पुण्याची वाट धरणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाला यंदाही वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. कोकण रेल्वेची स्थानके प्रवाशांनी अक्षरशः फुलून गेली असून, विशेष गाड्यांमुळे रेल्वे वाहतुकीवर ताण आला आहे. अनेक गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना स्थानकांवर ताटकळत बसावे लागत आहे. दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा महापूर आल्याने चिपळूण, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी तसेच रायगडमधील माणगाव परिसरात वाहतूक कोंडीने परतीच्या प्रवासाचा अक्षरशः खोळंबा केला आहे. यासर्वांचा नाहक त्रास कोकणातील गणेशभक्तांना बसला आहे.

गणेशोत्सवाचा उत्साह संपल्यानंतर आता गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सुमारे सहा लाख गणेशभक्त मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या दिशेने रवाना होत असल्याने कोकण रेल्वेची प्रमुख स्थानके आणि बसस्थानके गर्दीने फुलून गेली आहेत. नियमित तसेच विशेष रेल्वेगाड्या प्रवाशांनी खचाखच भरून धावत असून, स्थानकांवर प्रचंड गर्दीचे चित्र आहे.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने मध्य व पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने ३६० विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले होते. गौरी आगमनाच्या काळात वाढलेली गर्दी लक्षात घेऊन आणखी चार विशेष फेऱ्या वाढविण्यात आल्या. एसटी महामंडळ आणि खासगी बसेसच्या माध्यमातूनही मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणात दाखल झाले.

दीड दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनानंतर १५ सप्टेंबरपासूनच परतीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर पाच व सहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर १६ सप्टेंबरपासून रेल्वे स्थानकांवरील गर्दीने आणखी जोर धरला. रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर रोड स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असून उपलब्ध रेल्वेगाड्यांवर प्रचंड ताण आला आहे.

परतीसाठी १८२ विशेष रेल्वे फेऱ्या

परतीच्या प्रवासातील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने १८२ विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी आणि गाड्यांना होणारा विलंब यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीत फारशी घट झालेली नाही.

महामार्गावर वाहनांचा महापूर; चार-पाच किलोमीटरच्या रांगा

रेल्वेप्रमाणेच मुंबई-गोवा महामार्गावरही परतीच्या प्रवासाचा फटका बसला आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतर सलग दोन दिवस मोठ्या संख्येने वाहने मुंबईच्या दिशेने निघाल्याने चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि रत्नागिरी परिसरात वाहतुकीचा वेग अक्षरशः ठप्प झाला. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा चार ते पाच किलोमीटरपर्यंत पोहोचल्याने गणेशभक्तांना तासन्तास कोंडीत अडकून पडावे लागले.

वाशिष्ठ पुलावर वाहतुकीचा बोजवारा

चिपळूणमधील वाशिष्ठ पुलावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला. एकाचवेळी हजारो वाहने मुंबईच्या दिशेने निघाल्याने पुलावर लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन करावे लागले.

बहादूरशेख उड्डाणपुलाचे अपूर्ण काम कोंडीत भर

महामार्गावरील वाढत्या वाहनसंख्येसोबतच बहादूरशेख उड्डाणपुलाचे अपूर्ण कामही वाहतूक कोंडीसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. अपुरी वाहतूक व्यवस्था आणि वाहनांचा वाढलेला ताण यामुळे चिपळूण परिसरातील कोंडी अधिकच तीव्र झाली.

महामार्गावर कोंडी, पंपांवरही ‘वेटिंग’!

वाहतूक कोंडीच्या संकटातच पेट्रोल आणि सीएनजीसाठीच्या रांगांनी चाकरमान्यांच्या अडचणीत आणखी भर घातली. मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल आणि सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी सीएनजीसाठी एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली.

एकीकडे महामार्गावर वाहनांचा महापूर, दुसरीकडे किलोमीटरच्या रांगा आणि त्यात इंधनासाठी ताटकळण्याची वेळ, अशा तिहेरी कोंडीत चाकरमान्यांचा परतीचा प्रवास अडकला आहे. गणरायाला निरोप देऊन मुंबई-पुण्याकडे निघालेल्या गणेशभक्तांना या वाहतूक व्यवस्थेचा मोठा फटका बसत आहे.

दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाहनचालकांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.