‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याची ओळख करून देत ‘लोकसत्ता’ने सामाजिक बांधीलकी जपली आहे. यंदाचे हे या उपक्रमाचे चौथे वर्ष. यंदाही आम्ही गणेशोत्सवादरम्यान अशाच काही उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांची ओळख वाचकांना करून दिली. निराधार मुलांना आश्रय देणाऱ्या संस्थेपासून आजारी प्राणिमात्रांची शुश्रूषा करणाऱ्या संस्थेपर्यंत अशा विविध दहा संस्थांचा त्यात समावेश होता. या आमच्या उपक्रमाला सालाबादप्रमाणे यंदाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. मदतीच्या धनादेशांचा ओघही सुरू झाला आहे. पुन्हा एकदा या संस्थांची थोडक्यात ओळख..
नरहर कुरुंदकर अॅडव्हान्स्ड स्टडीज अॅण्ड रिसर्च सेंटर
विचार का करायचा आणि कसा करायचा हे थोर विचारवंत नरहर कुरुंदकरांनी अवघ्या महाराष्ट्राला शिकवले. त्यांच्या वैचारिक वारशाचे जतन करण्याचे प्रयत्न नांदेड येथील ‘नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’तर्फे केले जात आहेत. प्रतिष्ठानतर्फे शहराच्या मध्यवर्ती भागात ‘नरहर कुरुंदकर अॅडव्हान्स्ड स्टडीज अॅण्ड रिसर्च सेंटर’ची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या उभारणीचे काम सध्या सुरू आहे. मुख्य अडचण जागेची होती. मात्र, नांदेड एज्युकेशन सोसायटीने दीड एकर जागा उपलब्ध करून देत जागेचा प्रश्न मिटवला. चार वर्षांपूर्वी स्मारकाच्या जागेचे भूमिपूजन झाले. पण अजूनही कामाला प्रारंभ झाला नाही. आता तर कामाचे अंदाजपत्रक आठ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. सर्जनशील कार्यकर्त्यांपासून ते समाजाचे वैचारिक नेतृत्व करणाऱ्या धुरिणांपर्यंत सर्वानाच मार्गदर्शक ठरेल असा दीपस्तंभ या स्मारकाच्या रूपाने गोदातटी साकारत आहे. समाजाला उन्नत करणारे संशोधन या ठिकाणी होईल, असा विश्वास संस्थेला भेट देणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने या केंद्रास मान्यता दिलेली आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान हा अभ्यास केंद्राचा उपक्रम भविष्यातील अनेक संकल्पनांची पेरणी करणारा आहे.
धनादेश या नावाने काढावेत..
नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान, नांदेड
Narhar Kurundkar Pratishthan, Nanded

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन
कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करणे सोपे नाही. त्यासाठी आवश्यकता असते ती दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि त्याचबरोबर धनशक्तीचीही. अनेकदा रुग्णांकडे धनशक्तीच नसते. अशा गरजू कर्करुग्णांना केवळ पैशाच्याच माध्यमातून नव्हे तर औषधे, त्यांच्या उपचाराच्या खर्चाबरोबरच राहण्या-जेवण्याची सोय, रुग्णवाहिका पुरवण्याचे काम मुंबईतील कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) ही संस्था गेल्या चार दशकांपासून करते आहे. केवळ कर्करुग्णांना मदत करून ही संस्था थांबली नाही तर कर्करोगावरील महागडे औषध असलेल्या गिल्वेक या औषधाची किंमत सर्वसामान्य रुग्णांना परवडेल अशी करण्यासाठी या संस्थेने नोवार्टिससारख्या बलाढय़ औषध कंपनीशी यशस्वी लढाही दिला. रोगाचे निदान करण्यापासून रुग्णांना आर्थिक बाबतीत स्वावलंबी करण्यापर्यंतचे सर्व व्यवस्थापन संस्था करते. कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कामही संस्थेमार्फत केले जाते. आपल्या या कामात संस्थेला वेळोवेळी समाजाचा पाठिंबाही मिळाला. संस्थेने कार्यकर्त्यांचे जाळेही विणले असून त्यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे पार पाडली जातात. महिन्याला तीन हजारांहून अधिक रुग्णांना आवश्यक ती मदत करणाऱ्या या संस्थेसाठी देणग्या येत असल्या तरी वाढती मागणी पाहता समाजातून अधिकाधिक दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.
धनादेश या नावाने काढावेत..
कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन
Cancer Patients Aid Association

कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान
कलेच्या क्षेत्रात अजरामर ठरलेल्या केकी मूस यांची चाळीसगाव ही कर्मभूमी. चाळीसगाव रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या आपल्या बंगलीत या मनस्वी कलाकाराने आयुष्यभर केवळ आणि केवळ कलेची साधना केली. चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, ओरिगामी आणि अशाच अनेक कलांच्या विश्वात त्यांनी लीलया भ्रमंती केली. पाच दशकांच्या या वास्तव्यात त्यांनी जागतिक कीर्तीच्या असंख्य कलाकृती निर्माण केल्या. शेकडो चित्रे, छायाचित्रे, शाडू-मातीतील लक्षवेधी शिल्पे, ओरिगामीचे असंख्य नमुने, काष्ठ शिल्पाकृती, हस्तकलाकृती, व्यक्तिचित्रे, आभासी चित्रे अशा एक ना दोन हजारो कलाकृतींचा यात समावेश आहे. याशिवाय कलेच्या प्रांतातील जगभरातील दुर्मीळ पुस्तकांचा संग्रहही त्यांनी केला. मूस यांच्या मृत्यूनंतर या साऱ्या ठेव्याचे त्यांच्या घरातच संग्रहालयात रूपांतर करण्यात आले. ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’ या संस्थेकडे या साऱ्या ठेव्याचे पालकत्व आले. अपुरा निधी, मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या पाश्र्वभूमीवरही संस्थेने दुर्मीळ ठेव्याचे जतन केले; पण आता ही इमारत मोडकळीस आली आहे, आतील मांडणीही जुनी झाली आहे.  दुर्लक्ष होत असल्यामुळे संग्रहालय जतनासाठी संस्थेचा लढा एकटय़ाच्या जिवावर सुरू आहे.
धनादेश या नावाने काढावेत..
कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान
Kalamaharshi Keki Moos Pratishthan

जीवनज्योत मंडळ
पुण्यातील पौड रस्त्यावर गेल्या ३४ वर्षांपासून जीवनज्योतचे कार्य सुरू आहे. विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या या संस्थेच्या स्थापनेला सुरुवातीला अनंत अडचणी आल्या. मात्र, संस्थेच्या कर्त्यांधर्त्यां असलेल्या मीनाताई इनामदार यांनी हिंमत सोडली नाही. मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या पौड रस्त्यावरील वसतिगृहात सध्या चाळीस मुले-मुली आहेत. या विशेष मुलांच्या सर्व गरजा व अडचणी ओळखूनच या वसतिगृहाची रचना करण्यात आली आहे आणि या मुलांच्या सर्वागीण प्रगतीसाठीही संस्था सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे. एखाद्या आजाराने विशेष मुलगा वा मुलगी अगदी अंथरुणाला खिळून राहिली, तरच अशा मुलाचा सांभाळ अवघड होतो. अन्यथा, या मुलांची तहहयात काळजी घेण्याची तयारी संस्थेने केलेली आहे. सध्यादेखील चाळीस, पन्नास वय ओलांडलेल्यांचाही सांभाळ वसतिगृहात केला जात आहे. विशेष मुला-मुलींना शिक्षण देण्यापासून ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत आणि त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते त्यांना मायेने सांभाळण्यापर्यंत सर्व कामे जीवनज्योत मंडळात होत आहेत. तरीही सध्याची व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे या वसतिगृहांचा विस्तार संस्था करणार आहे. तशा योजनाही संस्थेने आखल्या आहेत. मात्र, निधीची चणचण हाच मुख्य अडथळा आहे. हितचिंतकांकडून मिळणाऱ्या देणग्यांवरच संस्थेचे कार्य आजवर सुरू राहिले आणि पारदर्शी कारभार व निरलस कार्यकर्त्यांच्या जोरावर पुढेही ते तशाच पद्धतीने सुरू राहणार आहे.
धनादेश या नावाने काढावेत..
जीवनज्योत मंडळ  
Jeevanjyot Mandal

ज्ञानदा वसतिगृह
चंद्रपूर जिल्ह्य़ातील वरोरा म्हटले की, सर्वाच्या ओठावर बाबा आमटेंच्या आनंदवनाचे नाव येते. याच आनंदवनाच्या मुख्य प्रवेशदारासमोर झाडांच्या गर्दीत ज्ञानदा वसतिगृहाची छोटेखानी वास्तू उभी आहे. आमटेंचे कार्य व ज्ञानदा यांच्यात तुलना होऊच शकत नाही, पण शिक्षणक्षेत्रात चमकू पाहणाऱ्या, पण परिस्थितीमुळे ते शक्य नसलेल्या अनाथ हिऱ्यांना कोंदण घालण्याचे काम गेल्या ४३ वर्षांपासून ‘ज्ञानदा वसतिगृहा’त अव्याहतपणे सुरू आहे. येथील आनंदनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक मधुकर उपलेंचवार यांनी १९७१मध्ये विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ज्ञानदाची स्थापना केली. गरीब व अनाथ विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकत त्यांच्या शिक्षणाची सोय करणाऱ्या वरोराच्या ज्ञानदा वसतिगृहाने शैक्षणिक वर्तुळात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आजवर एक हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करून त्यांना संस्कारक्षम करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ज्ञानदाला आता कार्यविस्ताराचे वेध लागले आहेत. शिक्षित तरुण हा संस्कारक्षम असलाच पाहिजे, असे ध्येय बाळगून सुरू झालेल्या ज्ञानदामधून बाहेर पडलेले एक हजार विद्यार्थी आज देशविदेशात उच्चपदावर आहेत. सनदी अधिकारी, वकील, अभियंते, डॉक्टर झालेले हे विद्यार्थी या संस्थेला दर वर्षी लाखोंची देणगी देतात. ज्ञानदामुळे शिक्षण घेण्याची अजिबात ऐपत नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आधार मिळाला आहे. त्याचे भान राखत आता हे सारे विद्यार्थी या संस्थेच्या हितासाठी तनमनधनाने झटत असल्याचे दुर्मीळ चित्र येथे बघायला मिळते.
धनादेश या नावाने काढावेत..
विद्यार्थी सहायक समिती, वरोरा
Vidyarthi Sahayak Samiti, Varora

आ धा रा श्र म  सं स्था
दातृत्व, पितृत्व, मातृत्व या गुणांचा समुच्चय असणारे आणि धैर्याने प्रेरित झालेले वैद्यराज अण्णाशास्त्री दातार, मुकुंदशास्त्री बापट, इंदुताई खाडिलकर आदींनी ४ एप्रिल १९५४ रोजी या आश्रमाची स्थापना केली. अनाथांचे ‘नाथ’ होऊन सहा दशकांपासून त्यांच्या कल्याणार्थ झटणाऱ्या नाशिक येथील ‘आधाराश्रम’ संस्थेचे कार्य आगळेच म्हणावे लागेल. या बालकांचे संगोपन करणे, शिक्षण देणे, हक्काचे आई-बाबा शोधून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम संस्था नेटाने करत आहे. याशिवाय, निराधार महिला, परित्यक्तांच्या संगोपनाचे कामदेखील अखंडपणे सुरू आहे. निराधारांचा खऱ्या अर्थाने आधार झालेल्या आधाराश्रमाने आतापर्यंत ६५००हून अधिक अनाथ, निराधार मुले-मुली तसेच महिलांच्या संगोपनाचे काम केले आहे. आजवर ७००पेक्षा अधिक बालकांना संस्थेने दत्तक देऊन हक्काचे घर मिळवून दिले आहे. आधाराश्रमातील बालकांसाठी शिक्षण, आश्रमकन्यांसाठी संगीत साधना वर्ग, हस्तकौशल्य, चित्रकला आणि नृत्य या विषयांचेही प्रशिक्षण दिले जाते. आश्रमकन्यांचे शिक्षण झाल्यावर वरसंशोधन करून त्यांचा विवाह लावून देण्यात येतो. हुंडाग्रस्त, परित्यक्ता, निराधार महिलांना मूलभूत सुविधा देण्यासह व्यवसायोपयोगी शिक्षण दिले जाते. शहरात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी संस्थेने कर्मचारी महिला वसतिगृहाची उभारणी केली आहे. आधाराश्रम संस्थेने अनंत अडचणींना तोंड देत हे कार्य लीलया
पेलले आहे.
धनादेश या नावाने काढावेत..
आधाराश्रम, नाशिक
Adharshram, Nashik

विज्ञान आश्रम
डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग या ऋषितुल्य अवलियाच्या संकल्पनेतून आणि कष्टातून लोणावळ्यानजीक पाबळ येथे विज्ञान आश्रम ही संस्था उभी राहिली आहे. ‘शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास’ हा त्यामागचा उद्देश होता. गेल्या ३१ वर्षांच्या काळात आश्रमाने अनेक विद्यार्थी घडविले आहेत. बहुतांश विद्यार्थी उद्योजक किंवा कुशल कारागीर म्हणून स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. त्यापैकी बहुतांश मुले औपचारिक शिक्षण पद्धतीत अपयशी ठरलेली होती. मात्र, आश्रमात त्यांच्यातील कौशल्यांना वाव मिळाला. त्यांनी समाजाच्या विविध गरजा भागविणारी अनेक उपकरणे, यंत्रे विकसित केली. या ठिकाणी अभियांत्रिकी, ऊर्जा-पर्यावरण, शेती-पशुपालन, गृह आणि आरोग्य या चार प्रमुख शाखांचे शिक्षण दिले जाते. या शिक्षणासाठी आठवी इयत्ता ही शैक्षणिक पात्रता आहे. केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, आशा फॉर एज्युकेशन, लेन्ड अ हॅण्ड इंडिया अशा संस्थांच्या मदतीने आश्रम आपले कार्यक्रम राबवत आहे. याचबरोबर देशविदेशातील आघाडीच्या तंत्रज्ञान संस्था विज्ञान आश्रमाच्या कामामुळे आकर्षित झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे जगप्रसिद्ध ‘मॅसेच्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी). या संस्थेने विज्ञान आश्रमात ‘फॅब लॅब’ उभी केली आहे. त्याद्वारे आपल्या मनातील अनेक कल्पनांना तंत्रज्ञानाद्वारे प्रत्यक्ष रूप देता येते. संस्थेला मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी आर्थिक पाठिंबा आवश्यक आहे.
धनादेश या नावाने काढावेत..
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन
Indian Institute of Education

अहिंसा
माणसाच्या आसपास वावरणारे प्राणी संरक्षणासाठी माणसावरच निर्भर असतात. प्राणीप्रेमावर आश्वस्त असलेले हे प्राणी कधी कधी उपद्रवकारी ठरतात. अशाच कुत्र्यांचे जगणेच हिरावून घेण्याची एक क्रूर पद्धत काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने सुरू केली होती. ती बंद करण्याच्या मागणीसह गेली १९ वर्षे भटकी कुत्री आणि भरकटलेल्या प्राण्यांना जीवदान देण्याचे व्रत घेतलेल्या मुंबईतील मालाड पश्चिम येथील ‘अहिंसा’ या संस्थेची कहाणी आगळीच म्हणावी लागेल. माणसाला ‘उपद्रव’ वाटणाऱ्या रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे जगणेच हिरावून घेण्याची एक क्रूर पद्धत काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने सुरू केली होती. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना गाडीत कोंबून मालाडच्या पश्चिमेकडील डम्पिंग ग्राऊंडशेजारी असलेल्या कोंडवाडय़ातील एका चेंबरमध्ये फेकून विजेचा शॉक देऊन त्यांना मारले जात असे. ‘अहिंसा परमो धर्म:’ हा संस्कार असलेल्या जैन समाजातील एक गट या क्रूरपणामुळे अस्वस्थ झाला. ही क्रूर पद्धत बंद करण्यासाठी काहींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि भटक्या कुत्र्यांना वेचून वेचून ठार मारण्याची अमानुष पद्धत न्यायालयाच्या आदेशावरून बंद झाली. या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी त्यांना पकडून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याचा उपाय पुढे आला आणि तसे करण्याची तयारी अहिंसाने दर्शविली. तेव्हापासून येथे मुक्या प्राण्यांची सेवा सुरू आहे. पदरमोड करून संस्था चालवली जाते.
धनादेश या नावाने काढावेत..
अहिंसा
Ahimsa

स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय
रत्नागिरी जिल्ह्य़ातील मंडणगड तालुक्यात घराडी येथे स्थापन करण्यात आलेल्या स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाने यंदा आपल्या वाटचालीचं दशक पूर्ण केलं. गेली दहा र्वष स्नेहज्योती विद्यालय, ही शाळा पूर्णपणे विनाअनुदान तत्त्वावर चालवली जात आहे. त्यामुळे दरमहा सुमारे दीड लाख रुपयांच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना विद्यालयाच्या संस्थापक-अध्यक्ष आशाताई कामत यांची बरीच धावपळ होते. प्रसंगी पदरमोड करून खर्च भागवावे लागतात. शासनाकडून अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तरीसुद्धा सातत्याने वाढणारे खर्च आणि भावी काळातील योजना लक्षात घेता संस्थेला भरीव कायमस्वरूपी निधीचीही गरज आहे. कोकणच्या निरनिराळ्या भागातील ५ ते १८ वयोगटांतील ३० मुलं-मुली येथे राहून शिक्षण घेत आहेत. पण अशा मुलांना खासगी किंवा सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्या मिळण्याची शक्यता कमी असते, हे लक्षात घेऊन आशाताईंनी त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची योजना आखली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सध्या केन वायरच्या पिशव्या, काथ्यापासून पायपुसणी, प्लास्टिकची फुलं, हार, तोरणं, फुलदाण्या, कागदी पिशव्या इत्यादी वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यामध्ये आणखी काही व्यवसायाभिमुख उपक्रमांची भर घालून स्वतंत्र व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मनोदय आहे. तसेच या केंद्राचं कार्य केवळ ‘स्नेहज्योती’च्या मुलांपुरतं मर्यादित न ठेवता अंध स्त्रियांनाही विविध कलांचं प्रशिक्षण देऊन स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी प्रवृत्त करण्याचं आशाताईंचं स्वप्न आहे.
धनादेश या नावाने काढावेत..
यशस्नेहा ट्रस्ट
Yashsneha Trust

ग्राममंगल संस्था
जिजूभाईबढेका, सरलादेवी साराभाई, ताराबाई मोडक आणि इतरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेल्या पहिल्या राष्ट्रीय बालहक्क शिक्षण चळवळीचा वारसा सांगणारी ‘ग्राममंगल’ ही संस्था महाराष्ट्रात विविध ठिकाणी दुर्गम भागातील शेकडो मुलांना आनंददायी वातावरणात शिकण्याची संधी उपलब्ध करून देते. अनुताई वाघ यांनी कोसबाड येथील आपले कार्य संपल्यानंतर डहाणू तालुक्यातील दाभोण येथे प्रा. रमेश पानसे आणि इतरांच्या सहकार्याने संस्थेचे रोपटे लावले आणि त्यापूर्वी कधीही शाळेत न गेलेल्या परिसरातील आदिवासी पाडय़ांवरील मुला-मुलींना विद्यार्थी होण्याची संधी मिळाली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ‘ग्राममंगल’ संस्थेचे विविध प्रकल्प डहाणू, विक्रमगड, पुणे, सातारा व बीड जिल्ह्य़ांत सुरू आहेत. विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत संस्थेला मिळत नाही. उलट अशाप्रकारच्या शाळा अनधिकृत ठरवून त्या बंद करण्याचा घाट शासनाने मध्यंतरी घातला होता. निरनिराळ्या व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या मदतीवरच ‘ग्राममंगल’चे
कामकाज चालते.
धनादेश या नावाने काढावेत..
ग्राममंगल   Grammangal