ganesh chaturthi special recipe 2023: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत आणि बाजारात ग्राहकांची वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी जमली आहे; तर घरात तरुण मंडळी सजावटीसाठी मेहनत घेताना दिसून येत आहेत. अशातच स्त्रिया गणरायासाठी नैवद्य काय बनवायचा याची तयारी करताना दिसून येत आहेत. बाजारात विविध प्रकारचे, अनेक रंगांचे मोदक सहज मिळून जातात; पण अशातच काही जणांना स्वतःच्या हाताने बनवलेले मोदक नैवेद्यासाठी ठेवायला आवडतात. तर आज एका व्हायरल व्हिडीओत काजू कतलीचा मोदक बनवण्यात आला आहे आणि हा मोदक कसा बनवला जातो याची एक खास झलक दाखवण्यात आली आहे. काजू कतली मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- १. २०० ग्रॅम काजू (१ किंवा १/२ कप)२. १ कप बारीक साखर किंवा आईसिंग साखर / पिठीसाखर३. १/२ कप दूध पावडर४. ५ ते ६ चमचे पाणी५. आणि सजावटीसाठी खाण्यायोग्य चांदीचे वर्ख काजू कतली मोदक बनवण्याची कृती : सगळ्यात आधी काजू मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली काजूची पावडर एका चाळणीतून चाळून घ्या. त्यानंतर त्यात पिठीसाखर, मिल्क पावडर आणि पाणी घालून मिश्रण एकत्रित करून घ्या आणि तयार करून घेतलेलं पीठ मोदकाच्या साच्यात भरून सुंदर असे मोदक तयार करून घ्या. तसेच चांदीचा वर्ख लावून मोदकाची सजावट करा आणि अशाप्रकारे तुमचा काजू कतली मोदक तयार होईल. तसेच युजरने टीपसुद्धा दिली आहे ती पुढीलप्रमाणे : १. काजू पावडर बनवताना खूप सावध रहा, फक्त २-३ सेकंद मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, नंतर काही क्षणासाठी थांबून बारीक झालेली काजूची पावडर तपासा. कारण काजू जास्त बारीक केल्यास काजूला तेल सुटेल आणि त्याची पेस्ट बनेल.२. तसेच साखरेचे कोणतेही दाणे या मिश्रणात नसावेत. साखर बारीक पावडरप्रमाणे असेल याची खात्री करून घ्याल. अशी टीप कॅप्शनमध्ये लिहिण्यात आली आहे. काजू कतली मोदकाचा हा खास व्हिडीओ @chefmodeon या 'मेघना कडू' शेफच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे; जो अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.