डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग या ऋषितुल्य अवलियाच्या संकल्पनेतून आणि कष्टातून उभी राहिली विज्ञान आश्रम ही संस्था. ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनीअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा, चिंतनाचा विषय. त्यांनी १९८३ च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. शाळा सोडलेली अनेक मुले जीवनात यशस्वी होतात. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी.. या विचारातून डॉक्टरांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली.
दररोज किती तरी जणांना डॉक्टरेट जाहीर होते.. महाविद्यालये-विद्यापीठ पातळीवर शेकडो संशोधने होत असतात.. संशोधनाच्या विविध विषयांवर किती तरी चर्चा-परिसंवाद-परिषदा होतच असतात.. पण त्यांच्या अभ्यासाचा समाजाला कितीसा उपयोग होतो? उत्तर सर्वानाच माहीत आहे- अगदीच नाममात्र! कारण, शिक्षण आणि समाज यांच्यात मुळी संबंधच नाही किंवा तो पूर्णपणे तुटलेला आहे. एकीकडे शिक्षण क्षेत्र आपल्या विश्वात मग्न आहे, दुसरीकडे समाजाच्या गरजा/ तऱ्हतऱ्हेच्या समस्या तर वाढतच आहेत. स्वाभाविकपणे प्रश्न पडतो, शिक्षणाने या गरजांना/ समस्यांना भिडायला नको का? याबाबत सर्वसाधारणपणे विपरीत स्थिती असली तरी त्याला काही अपवाद नक्कीच आहेत. समाजाच्या गरजांना भिडणे हेच शिक्षण; या गरजा बदलतील तसा अभ्यासक्रमही बदलायचा हा विचार राबविणारी आणि त्याच पद्धतीने चालणारी एक संस्था तीन दशकांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. तिने आता घट्ट पाय रोवून आपला विस्तारही चांगलाच वाढविला आहे. नाव आहे- विज्ञान आश्रम. मुक्काम पोस्ट- पाबळ, जिल्हा- पुणे. पाबळ हे ऐतिहासिक गाव. बाजीराव पेशव्यांच्या मस्तानीचे थडगे याच गावात. गावालगतचे टेकाड चढून गेले, की एक मोबाइलचा टॉवर लागतो. हीच विज्ञान आश्रमाची खूण. बाहेर छोटीशी पाटी. त्यावर अक्षरं होती- भारतीय शिक्षण संस्था, पुणे संचालित विज्ञान आश्रम, पाबळ!
डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग या ऋषितुल्य अवलियाच्या संकल्पनेतून आणि कष्टातून उभी राहिलेली ही संस्था. ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनीअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा, चिंतनाचा विषय. त्यांनी १९८३ च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. शाळा सोडलेली अनेक मुले जीवनात यशस्वी होतात. औपचारिक शिक्षणाशिवाय ती कुठे शिकतात?.. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी.. या विचारातून डॉ. कलबाग यांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. त्यांनी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्याशी चर्चा केली. भारतातील एक प्रातिनिधिक खेडे म्हणून आश्रम पाबळ येथे सुरू झाला. पुढे इथेच इतिहास घडला. पाच एकरांवर पसरलेला पाबळचा विज्ञान आश्रम पाहताना हा इतिहास उलगडत गेला. सध्याचे संचालक योगेश कुलकर्णी माहिती देत होते. काही जण गोठय़ात गायीची धार काढत होते, चारा घालत होते. त्यांचा या कामांचा दिवस होता. इथे आपापल्या शिक्षणाच्या तासांचे वेळापत्रक असते! या गोठय़ात एक पाटी पाहिली. लिहिले होते- आजचा ४१६ रुपये तोटा. त्याबाबत कुतूहल निर्माण झाले. त्याचा अर्थ कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेताना आश्रमाच्या कार्यपद्धतीची झलक पाहायला मिळाली. आश्रम एक असला तरी त्याचे वेगवेगळे विभाग, तेसुद्धा स्वायत्त! त्यांचा एकमेकांशी व्यवहार चालतो. डेअरी विभाग, शेती विभाग, पशुपालन विभाग, रोजच्या स्वयंपाकाची जबाबदारी असलेला विभाग आदी.. विशेष म्हणजे हे विभाग आपले उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब ठेवतात. उदाहरणार्थ- पशुपालन विभाग जनावरांचे दूध काढतो आणि ते स्वयंपाकाची जबाबदारी असलेल्या विभागाला विकतो. त्यातून जे (कागदोपत्री) पैसे मिळतात. त्यातून जनावरांच्या चाऱ्याचा खर्च भागवतो. हा खर्च आणि नफा याची गोळाबेरीज म्हणून डेअरी विभागाच्या फलकावर ‘तोटा ४१६ रुपये’ झळकला होता..
ग्रामीण तंत्रज्ञान पदविका
आश्रमात फेरफटका मारताना एक वास्तू दिसली. ती विद्यार्थ्यांनी उभारली होती. आश्रम पाहायला आलेल्या लोकांना बसण्यासाठी काहीच नव्हते, म्हणून ती उभारली होती, तीसुद्धा शिक्षणाचा भाग म्हणून! ती बनविणारी मुले कोण? असे विचारताच जवळच खेळत असलेला अक्षय आला. मूळचा आंध्र प्रदेशातला. छान मराठी बोलत होता. त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी ही वास्तू उभारली होती. ती उभारताना फॅब्रिकेशन, फेरोसिमेंट वापरणे, बांधकाम, इलेक्ट्रिकची कामे अशा अनेक गोष्टींचे आपोआपच शिक्षण झाले.. इथे सुटे-सुटे विषय शिकवले जात नाहीत. समस्या सोडविण्यातून मुले शिकतात. आश्रमात एक वर्षांचा ‘ग्रामीण तंत्रज्ञान पदविका’ हा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे- आठवी पास किंवा नापास. गंमत म्हणजे इतके वास्तववादी शिक्षण दिले जात असूनही येथे शिक्षण घेणाऱ्यांमध्ये तथाकथित हुशार वगैरे मुलांचे प्रमाण नगण्यच. बहुतांश जण औपचारिक शिक्षणात रस न घेणारे किंवा त्यात गती नसलेले, आर्थिक कारणामुळे औपचारिक शिक्षण घेऊ न शकणारे किंवा इतरत्र प्रवेश न मिळालेले. ‘त्यांच्यातच प्रचंड ऊर्जा असते, ती येथे पाहायला मिळते.’ कुलकर्णी सांगत होते.    
विज्ञान आश्रम, पाबळ
सुधारगृहातील मुले, वाट चुकलेली मुले, काही शिक्का बसलेली मुले अशांनाही आश्रमाने सामावून घेतले, बळ दिले. शिक्षण व्यवस्थेने आपल्याला नाकारले आहे, ही बोचणारी जाणीव घेऊन ही मुले आश्रमात येतात, पण येथून जाताना ती आयुष्यभराचा आत्मविश्वास घेऊन जातात! ही शिक्षण पद्धती समाजात रुजविण्यासाठी, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आश्रमाला समाजाकडून जास्तीत जास्त पाठिंबा आणि बळ हवे आहे!
सध्या आश्रमात महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश अशी आठ राज्यांमधील मुले आहेत.  ही मुले स्थानिक गरजांनुसार तंत्रज्ञान विकसित करतातच, त्याचबरोबर जगभरातील अद्ययावत तंत्रज्ञानही त्यांना उपलब्ध करून दिले जाते. अमेरिकेतील एमआयटी संस्थेने सुरू केलेली ‘फॅब लॅब’ ही येथे आहे.
आश्रमाच्या शिक्षण पद्धतीमुळे, रूढार्थाने हुशार नसलेली अनेक मुले उद्योजक बनली आहेत. आतापर्यंतच्या प्रवासात असे घडलेले सुमारे दीड हजार उद्योजक व कारागीर यांची नोंद आश्रमाने केली आहे. याशिवाय नोंद नसलेले अनेक जण या पद्धतीमुळे स्वत:च्या पायावर उभे आहेत. परिस्थितीमुळे मुख्य प्रवाहाबाहेर असलेल्या अनेक मुलांना आश्रमाच्या शिक्षण पद्धतीमुळे आधार मिळाला आहे.
“मी दहावी नापास झाल्यावर विज्ञान आश्रमात आलो. शिकल्यावर येथेच चार वर्षे काम केले. मग पुण्यात एका कंपनीत शिफ्ट इनचार्ज म्हणून काम करून लागलो. तिथेच हॉटेल टाकले. स्वत:चा ट्रान्सपोर्टही सुरू केला. वेल्डिंग-अ‍ॅसेंब्लीचे वर्कशॉपपण टाकले. एवढे सगळे मी केवळ आश्रमामुळे करू शकलो. “
– ज्ञानेश्वर हरकळ (माजी विद्यार्थी, मूळचा परभणी जिल्ह्य़ातील)

संस्थेपर्यंत कसे जाल?
पुणे-नाशिक रस्त्यावरील राजगुरूनगर किंवा पुणे-नगर रस्त्यावरील शिक्रापूर या ठिकाणांवरून पाबळकडे जाता येते. दोन्हीकडून एसटी बसची व्यवस्था आहे. पाबळ गावाजवळच्या टेकडीवर, गावापासूनचे अंतर- दीड किलोमीटर.

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

विज्ञान आश्रमात पाळली जाणारी तत्त्वे..
*शिकायचे ते हाताने काम करतच.
*निसर्ग हा अभ्यासक्रम आणि बहुविध गोष्टींचे कौशल्य हेच शिक्षण. अभ्यासक्रमात शेती-पशुपालन; अन्नप्रक्रिया, प्रयोगशाळेतील चाचण्या, शिवणकाम यांचा समावेश असलेला गृह व आरोग्य; फॅब्रिकेशन, बांधकाम, सुतारकाम आदींचा समावेश असलेला अभियांत्रिकी; तर सौरऊर्जा, जैविक तंत्रज्ञान, आदींचा समावेश असलेले ऊर्जा-पर्यावरण असे वेगवेगळे भाग. हा अभ्यासक्रम लोकांच्या गरजा पाहून हळूहळू विकसित होत गेला.
*शाळेत उत्पादन व्हावे आणि शाळांनी लोकांना सेवा दिल्या पाहिजेत. अर्थात त्याचा मोबदला शाळांना मिळाला. या तत्त्वामुळेच विज्ञान आश्रम आसपासच्या लोकांच्या गरजा पुरवू शकला. लोकांनी त्यांच्या गरजा, समस्या सांगाव्यात, की विज्ञान आश्रम त्यावरील उपाय शोधण्याच्या कामी लागतो. तेच शिक्षण बनते आणि या गरजांमधूनच इथला अभ्यासक्रम तयार होतो. लोकांच्या गरजा कोणत्या?.. तर शौचालये बसविणे, पाणी-मातीचे परीक्षण करून देणे, शेतात ठिबक सिंचनाची व्यवस्था करून देणे, जनावरांना लसी देणे, कृत्रिम रेतन करून देणे.. अशा तब्बल ४५ प्रकारच्या सेवा विज्ञान आश्रम नावाची शाळा पुरविते. त्यातूनच शाळा आणि समाज यांच्यातील संवाद, संबंध वाढत गेला. त्यांना एकमेकांचे अस्तित्व आवश्यक वाटू लागले. याचा प्रत्यय आश्रम पाहताना येतोच. ५०० ते १००० अंडी उबविण्यासाठी वापरता येईल असे मशीन, पाच हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर.. ग्रामीण उद्योजकांच्या, शेतकऱ्यांच्या या गरजा होत्या. त्या आश्रमाने पूर्ण केल्या. या गोष्टी आश्रमातील मुलांनी विकसित केल्या. त्यामार्फत आश्रमाने लोकांना सेवा दिल्या. पुढे या गोष्टींचा प्रसार झाला, की आश्रमाने हे काम थांबविले आणि वेगळ्या गरजांची उत्तरे शोधणे सुरू केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे गोपनीय ठेवण्याऐवजी सोपे करून लोकांपर्यंत पोहोचविणे हाही त्यामागचा एक उद्देश.
’इथले मार्गदर्शक (इन्स्ट्रक्टर) स्वत: कुशल काम करणारे असतात. त्यांनी औपचारिक शिक्षण घेतले असो वा नसो; त्याला वेगवेगळ्या कामांतील आपल्या कौशल्याचे प्रात्यक्षिक देता यावे लागते. त्यालासुद्धा विद्यार्थ्यांसोबत लोकांना सेवा देता यायला हवी.. ही अट पूर्ण करणारेच मार्गदर्शक इथे असतात; उंटावरून शेळ्या हाकणारे किंवा नुसतेच बोलघेवडे नव्हेत!

धनादेश या नावाने काढावेत
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन
 Indian Institute of Education
( कलम ८० जी अन्वये देणग्यांना प्राप्तिकर सवलत)